कशिश पार्क येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
ठाणे : सिंगापूरात जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या सुप्रसिध्द ‘गार्डन बाय द बे’ या उद्यानातील बेबी स्कल्पचर व अमेरिकेतील जॉय ऑफ म्युझिक स्कल्पचर अशा आंतरराष्ट्रीय शिल्पांची हुबेहूब प्रतिकृती ठाण्यातील कशिश पार्क येथे नव्याने लोकार्पण झालेल्या महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उद्यानात साकारण्यात आले आहे. या उद्यानाचे लोकार्पण शिवसेना नेते, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले असून हे उद्यान कशिशपार्कवासियांसाठीच नाही तर सर्व ठाणेकरांसह इतर शहरातून येणाऱ्या नागरिकांसाठी एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून परिचीत होईल असे गौरवोद्गगार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.
दोन रस्त्यांच्या कामांचाही शुभारंभ
ठाण्याच्या प्रभाग क्र. 19 मधील तीन हातनाका ते ॲपलब सर्कल, एल.बी.एस रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा आणि रहेजा गृहसंकुलालगतच्या सेवारस्त्याच्या डांबरीकरणाच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आला. यामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले ते महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उद्यानाचा लोकार्पण सोहळा. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व स्थानिक शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे व वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले-जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या या उद्यानाचे लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार रविंद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण, क्रीडा समिती सभापती प्रियांका पाटील, परिवहन समिती सभापती विलास जोशी, माजी महापौर संजय मोरे, नगरसेवक राजन किणे, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अध्यक्ष भूषण भोईर, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त मुख्यालय (उद्यान) विजयकुमार म्हसाळ, वरिष्ठ उद्यान निरीक्षक केदार पाटील आदी उपस्थित होते.
विकासनिधीचा सुयोग्य वापर…
महाराष्ट्रात या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उद्यानाच्या प्रतिकृतीची कीर्ती पसरेल. तसेच ठाणे महानगरपालिकेचा विकासनिधीचा सुयोग्य वापर कसा करावा, याचे हे उद्यान उत्तम उदाहरण असल्याची पोचपावती ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी दिली.
स्कल्पचर…ॲम्पीथिएटर…ध्यानधारणा केंद्र…मनमोहक कारंजे
महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी हे उद्यानात सिंगापूरच्या बेबी स्कल्पचरची हुबेहूब प्रतिकृती बसविण्यात आली आहे. तसेच अमेरिकेतील जॉय ऑफ म्युझिक हे स्कल्पचर देखील साकारण्यात आले आहे. ॲम्पीथिएटर, ध्यानधारणा केंद्र, ॲक्युप्रेशर (पेबल्स) वॉक, गौतमबुध्दाची प्रतिकृती सोबत मनमोहक कारंजे बसविण्यात आली असून उद्यानात येणाऱ्या नागरिकांसाठी व लहान मुलांसाठी बटरफ्लाय सेल्फी पाँईट आदी विविध सोईसुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे उद्यान कशिशपार्कवासियांसाठीच नाही तर सर्व ठाणेकरांसाठी एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून परिचीत होईल असे सांगतानाच पालकमंत्री शिंदे यांनी या प्रेक्षणीय उद्यानाची निर्मिती करणाऱ्या टीमचे कौतुकही केले.