मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने यंदाचा गुढीपाडवा (Gudi Padwa)आपण एका नव्या संकल्पाने ‘सद्भावनेची गुढी’ उभारून साजरा करावा असे आवाहन करण्यात येत आहे. जातीधर्मांत निर्माण झालेले अंतर हे आपल्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि वैभवशाली परंपरेशी सुसंगत नाही. म्हणूनच, यंदाच्या गुढीपाडव्याला आपण सद्भावनेचा संकल्प करणार आहोत.
“आज आपला शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा हा महाराष्ट्र पुढे घेऊन जात समाजा समाजात, जातीधर्मांत अकारण जो दुरावा दिसत आहे तो मिटवण्याचा नवसंकल्प आपण यंदा ही सद्भावनेची गुढी उभारताना करूया. आपल्या महाराष्ट्रात सदैव सर्व जाती धर्म पंथ गुण्यागोविंदाने नांदले आहेत. हीच समृद्ध परंपरा आता आपल्याला पुढे न्यायची आहे”, असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे(Sunil Tatkare) यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिला.
तसेच, गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी इस्लाम धर्मातील पवित्र मानला जाणारा आणि सद्भावनेचे प्रतीक असणारा ईद उल फित्र देखील येत आहे. एकता, बंधूभाव आणि सद्भाव जपणाऱ्या या दोन्ही सणांच्या निमित्ताने आपण उत्साहाची, सद्भावनेची गुढी उभारूया आणि आनंदाने व सद्भावनेने गळाभेट घेऊया”, असे आवाहन सुनील तटकरेंनी केले.
गुढीपाडव्याच्या मंगलदिनी घराघरात उभारली जाणारी गुढी केवळ विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक नसते तर ते संस्कृती, परंपरा आणि नवचैतन्याचे द्योतक असते. ही संस्कृती अन् सद्भावना आपल्याला सदैव जपायची आहे.
येणारा प्रत्येक दिवस हा फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहिल असा मानस आपण सर्वांनी एकत्र येत ठेऊया, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला करीत आहोत.