12 लाख ईनाम असलेल्या जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण.

गडचिरोली: शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. नुकतेच 12 लाख रुपये बक्षीस असलेले नक्षलवादी नामे कोलु ऊर्फ विकास ऊर्फ सुकांत विनोद पदा, वय 27 वर्ष रा. वक्कुर, पोस्टे कोयलीबेडा, ता. आरेच्छा जि. नारायणपूर (छ.ग.) व राजे ऊर्फ डेबो जैराम उसेंडी वय 30 वर्ष रा. जवेली (बु.) ता. एटापल्ली जि. गडचिरोली या दोन जहाल नक्षलवाद्यांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या समोर आत्मसमर्पण केले.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन 2019 ते 2022 सालामध्ये आतापर्यंत एकुण 47 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, सन 2022 या चालु वर्षात एकुण 02 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल यांनी केले आहे.

कोलु पदा हा सप्टेंबर 2010 रोजी प्रतापपूर दलम सदस्य पदावर भरती झाला होता. नोव्हेंबर 2011 ते सन 2017 पर्यंत तो सीसीएम सुधाकर याचे सुरक्षा गार्ड म्हणुन कार्यरत होता. त्यानंतर जुलै 2017 ते डिसेंबर 2021 पर्यंत कंपनी क्र. 10 मध्ये तो सेक्शन कमांडर पदावर कार्यरत होता.
कोलु पदा याचेवर 03 खून, 07 चकमक, 01 दरोडा असे एकुण 11 गुन्हे दाखल आहेत.
नक्षलमध्ये कार्यरत असतांना त्याने विविध ठिकाणी 03 अॅम्बुश लावले होते .त्याने लावलेल्या छत्तीसगडमधील मौजा अवालवरसे (छ.ग.) महाराष्ट्रामधील मौजा झारेवाडा, पोयारकोठी, अॅम्बुशमध्ये व ओडीसामधील मौजा गुंडापूरी, कंजेनझरी, चुरामेट्टा या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता.

राजे ऊर्फ डेबो जैराम उसेंडी

ही फेब्राुवारी 2011 मध्ये कसनसूर दलम सदस्य पदावर भरती झाली होती.सप्टेंबर 2012 ते माहे डिसेंबर 2021 पर्यंत कंपनी क्र. 10 मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्रातील पोमके कोठी हद्दीतील मौजा पोयारकोठी जंगल परिसरात लावलेल्या अॅम्बुशमध्ये 1 पोलीस अधिकारी व 01 पोलीस जवान शहीद झाले.

राजे उसेंडी हीचेवर 01 खून, 04 चकमक, 01 जाळपोळ असे एकुण 06 गुन्हे दाखल आहेत.
सन- 2019 रोजी मौजा मुसपर्शी येथील साईनाथ तव्वे या इसमाच्या खुनात तिचा सहभाग होता.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता शासनाकडून कोलु पदा यास 3.50 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.तर राजे उसेंडी हीला 2.50 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे. पती-पत्नीने एकत्रीत आत्मसमर्पणानंतर अतिरिक्त 1.50 लाख असे एकुण 7.50 लाख रुपये तसेच शासनाच्या इतर योजनेचा लाभ त्यांना मिळवून देण्यात येणार आहे.

Social Media