तेवीस आणि ते ‘वीस’! २३नोव्हेंबरच्या निकालानंतरच्या कापूस कोंड्याची गोष्ट! ताज्या सर्वेक्षणांच्या पलिकडे!

मित्र हो, तुंम्हाला अंक गणित, बीज गणित, आकडेमोड, किंवा हिशेबाचा कंटाळा असेल तरी येत्या काही दिवसांनंतर आपल्याला हे सारे हिशेब कसे असतील ते २३ तारखेनंतर करावेच लागणार आहेत. २३ नोव्हेंबर ला महाराष्ट्राच्या विधानसभांचा निकाल आहे. ही तारीख सुध्दा खूप गमतीशीर आहे बरे का? म्हणजे तुम्ही एखाद्याला विचाराल की सांग पाहू तेवीस आणि तेवीस किती? तो म्हणेल ४६. तर तुम्ही म्हणायच चूक! ते’वीस’ आणि ते’वीस’ मग त्याने सांगितले की ‘चाळीस’, तरी तुम्ही म्हणायचे की चूक! ‘तेवीस आणि तेवीस!’ तर अश्या या तारखेला ही निकालांची कापूस कोंड्याची गोष्ट होणार आहे बरे!

bjp
राज्यात कुणाला किती जागा मिळणार? आणि कुणाचे सरकार असेल? कोण विरोधीपक्षात बसेल? आणि कौन बनेगा मुख्यमंत्री? अश्या या प्रश्नांची उत्तरे या २३ तारखेला येणार आहेत. पण ती काय असतील याचा अंदाज घेणारे तीन ओपीनियन सर्वेक्षण सध्या समोर आले आहेत. त्यात सी वोटर, सीएसडिएस यांच्या सह आणखी एका नवख्या सर्वेक्षणाचा(Survey) ‘इलेक्ट्रोल ऐज’(Electrole Edge) चा समावेश आहे.

Maharashtra-Assembly-elections
सी- वोटर(C- Voter) ज्यांना माहिती आहे ते लोक म्हणतील की, ‘सांगा बरे काय म्हणतोय सी वोटर? तर त्यात ५१टक्के लोकांना नवे सरकार हवे आहे! (म्हणजे या सर्वेक्षणात उत्साहावर पाणी!) पण जवळपास तेवढेच लोक ४१ टक्के लोक सध्याचे सरकार योग्य आहे म्हणत आहेत. साडेतीन (?) टक्के लोक खूश आहेत पण त्यांना हेच सरकार हवे आहे. या सर्वेक्षणात मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती शिंदे यांना २७ टक्के त्या खालोखाल उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) २३टक्के आणि केवळ १० ते १३ टक्के लोकांना देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis)मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. गंमत म्हणजे या सर्वेक्षणात सरकारचे कामकाज चांगले आहे, असे ५२ टक्के लोक सांगत आहेत, सरासरी आहे असे २१ टक्के म्हणत आहेत आणि खराब कामगिरी २३टक्के म्हणत आहेत. म्हणजेच या सर्वेक्षणाचा बॅण्ड येथेच वाजला आहे. कारण या सर्वेक्षणानुसार सरकारची कामगिरी लोकांना चांगली वाटत आहे, शिंदे नंबर वन मुख्यमंत्री आहेत पण हे सरकार लोकांना नको आहे असा निष्कर्ष यातून निघत आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाचे काही खरे नाही!

Eknath-Shinde

दुसरा सर्वेक्षण अहवाल आहे सीएसडीएस लोकनिती या़ंचा, त्यात उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक २८ टक्के पसंती आहे. दुसऱ्या क्रमांकावर २० टक्के एकनाथ शिंदे यांना आहे तर तिसऱ्या क्रमांकावर फडणवीस १५ टक्के पसंती आहे. चाळीस टक्के पेक्षा जास्त लोक महागाई बेरोजगारीच्या मुद्यावर मतदान करण्यास इच्छुक आहेत, जे सी वोटर मध्ये केवळ २३ टक्के आहेत. या मध्ये १२टक्के लोक मोदींच्या चेहऱ्यावर मतदान करणार आहेत. म्हणजे या सर्वेक्षणाला चार महिन्यांपूर्वी लोकसभेत काय झाले? त्याची माहिती नसल्याचे दिसत आहे. या सर्वेक्षणानुसार शिंदेच्या कामगिरीवर ५१ टक्के लोक नाखूश आहेत पण ५३ टक्के लोकांनी सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केला आहे, आहे की नाही गंमत?. या दोन्ही सर्वेक्षणात एक समानता आहे ती म्हणजे ‘भाजप स्वबळावर सत्तेवर येत नाही’ इतकेच काय ‘शंभरी देखील पार करत नाही’ आणि मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची कितीही इच्छा असली तरी त्यांना सर्वेक्षण(Survey) तसे होवू देत नाहीत!

उद्धव-ठाकरे
तिसरा सर्वेक्षण अहवाल नवा आहे, तो आहे इलेक्ट्रोल ऐज यांचा त्यांच्या गणिताच्या मते भाजप सत्तेवर आली तर शिंदेना आणि कॉंग्रेस आघाडी आली तर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होता येत नाही. आघाडीला हा सर्वे बहुमताच्या आकड्यापेक्षा (१५७) १२ जागा जास्त देत आहे. महायुतीला ११७ जागा देत आहे म्हणजे बहुमताला २८ जागा कमी आहेत. आघाडीत कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष असेल त्यांना ६८ जागा मिळतील ४५ जागा शरद पवारांना ४१ जागा उध्दव ठाकरेना हा सर्वे देत आहे. अजीत पवार १४ -१५ जागा मिळतील शिंदेना २० ते २२ जागा, भाजपला महायुतीत सर्वाधिक ७९ जागा मिळण्याचा अंदाज आहे.


या सर्वेक्षणांचा एकूण होरा काय आहे? त्याचा सारांश काय आहे? तर महाराष्ट्राच्या जनतेला पक्ष फोडण्याची जी काही राजनीती मागील काळात झाली ती मान्य नाही. अश्या पक्षांना, गटांना जनता धडा शिकवेल. मुख्यमंत्री पुन्हा होण्यासाठी आतूर कुणाही नेत्याला हे पद मिळण्याची शक्यता नाही असे या सर्वेक्षणांचे अंदाज आहेत. आता हरियाणामध्ये देखील अश्याच प्रकारे सर्वेक्षण अहवाल होते पण निकाल मात्र त्या विपरित लागले हे देखील लक्षात असायला हवे. त्यामुळे नेमके काय होणार ते सांगता येत नाही, पुन्हा हाच प्रश्न घेवून निवडणूकांची रणधुमाळी सुरूच राहणार आहे. या निमित्ताने जनमताचा कल काय आहे त्याची चाचपणी होत असते. मात्र २३ तारखेनंतर ज्या मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे. कोण कुणासोबत जाणार आहेत? कुणाला कुणासोबत जायला भाग पाडले जाणार आहे? यावर सर्वेक्षणात आताच काही सांगता येत नसल्याने पुन्हा तेवीस आणि तेवीस किती? या आधीच्या प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न २३ नोव्हेंबर पर्यंत करा पाहू!


सर्वात महत्वाचे म्हणजे मोठ्या प्रमाणात बंडखोर, अन्य पक्षांचे जे उमेदवार रिंगणात आहेत त्यांच्याबाबत या सर्वेक्षणांचा कल फारसे काही सांगत नाही. महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी नेमकी किती राहिल? त्यानंतर त्यात टोकाची लढाई कशी होण्याची शक्यता आहे? बहुरंगी लढतीमध्ये अगदी काठावर कुणाच्या जागा येतील? आणि कुणाला त्याचा फटका बसेल? या कळीच्या मुद्यांवर हे ढोबळ सर्वेक्षण जात नाहीत. राज्यात जाणकारांच्या मते अन्य पक्ष आणि अपक्षांचे बंडखोरांचे या पंधराव्या विधानसभेत मोठे पिक येण्याची शक्यता आहे. किमान वीस ते पन्नास जागांवर बंडखोर, अपक्ष आणि अन्य पक्षांना काठावर मतदान होवून ते विजयी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २८८ मध्ये किमान वीस ते पन्नास जागा प्रस्थापित पक्षांपासून दूर गेल्या तर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यात केंद्रात मोदी सरकार जसे कुबड्या घेवून आले तसेच महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार का? पुन्हा त्यात दोन्ही राष्ट्रवादी किंवा शिवसेना एकत्र होण्याची प्रक्रिया पुन्हा होणार का? आणि तसे झाले तर ते कोणत्या बाजुला जाण्याचा निर्णय घेतील? अश्या भविष्यात चक्रावून टाकणाऱ्या राजकीय अंकाची सुरूवात तेवीस तारखेला पहायला मिळेल! म्हणून मोजत रहा तेवीस आणि ते वीस किती?!

किशोर आपटे

(लेखक व राजकीय विश्लेषक)

 

महायुतीचे एकच कलेवर असताना त्रिमुर्तीची तोंडे मात्र तीन दिशांना दिसायचे कारणही हेच तर नसावे?

Social Media