मुंबई : तलाठी भरती प्रक्रिया(Talathi Recruitment Process) ही पहिल्या दिवसापासूनच संशयाच्या भोवऱ्यात होती. नुकत्याच झालेल्या तलाठी भरती परीक्षेच्या निकालावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाचे कारण म्हणजे परिक्षेत प्रथम क्रमांक पटकवलेल्या मुलीला चक्क 200 पैकी 214 गुण मिळाले आहेत.
यावरुनच शिवसेना(Shiv Sena) ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील (Kailash Patil)यांच्यासह विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले आहे. तसेच ही परिक्षा रद्द करुन नव्याने पारदर्शक परीक्षा घेण्याची मोठी मागणी ठाकरे गटाने केली आहे. जर मागणी मान्य न केल्यास विद्यार्थ्यांसोबत शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरणार असल्याचाही इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
गेल्या वर्षी तलाठी भरती परीक्षा 3 भागात आणि 57 सत्रामध्ये घेण्यात आली आहे. या परीक्षेस महाराष्ट्र (Maharashtra )भरातून तलाठी पदासाठी 10 लाख 41 हजार 713 परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले. 8 लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली. पण निकाल जाहीर झाला आणि एकच गोंधळ उडाला.