मुंबई : मुंबईतील टाटा मेमोरिअल केंद्राने इंडोनेशियातील कर्करोग रुग्ण सुविधेत सुधारणा करण्यासाठी आजच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त कर्करोग रुग्ण दिशादर्शन कार्यक्रमासंदर्भातील भागीदारी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. इंडोनेशिया धर्मैस राष्ट्रीय कर्करोग रुग्णालय आणि पीटी रोशे यांनी आभासी पद्धतीने या सामजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
आरोग्य सुविधा प्रणालीतील अडचणी दूर करण्यासाठी हे पेशंट नेव्हिगेटर्स अर्थात ‘रुग्ण दिशादर्शक’ कर्करोगाचे रुग्ण, त्यांचे कुटुंबीय आणि काळजीवाहक यांना योग्य मार्गदर्शनासह व्यक्तिगतरित्या सर्व प्रकारची मदत पुरवतील.
टाटा मेमोरिअल केंद्राचे संचालक डॉ.राजेंद्र बडवे म्हणाले की, उत्तम दर्जाचे कर्करोगावरील उपचार सहजतेने उपलब्ध असताना देखील या रुग्णांच्या उपचारप्रणालीच्या अनुपालनात काही समस्या उद्भवतात. टाटा मेमोरिअल केंद्र आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, कर्करोगाच्या रुग्णांवरील उपचारांचे सकारात्मक परिणाम मिळविण्यासाठी त्यांच्या आर्थिक, भावनिक, मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक गरजा पुरविणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले. आणि ही भूमिका हे ‘दिशादर्शक’ बजावत आहेत.
इंडोनेशियामध्ये सध्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी असे दिशादर्शक उपलब्ध नाहीत. या पार्श्वभूमीवर टाटा मेमोरिअल केंद्राशी झालेल्या सामंजस्य कराराला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
इंडोनेशिया येथील भारतीय राजदूत मनोजकुमार भारती म्हणाले की हा सामंजस्य करार म्हणजे भारत-इंडोनेशिया नातेसंबंधांमधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. “इंडोनेशियाकडे जी-20 गटाचे अध्यक्षपद असताना आणि आरोग्य हे त्याच्या तीन महत्त्वाच्या लक्ष्यीत क्षेत्रांपैकी एक असताना झालेला अत्यंत योग्य वेळी झालेला हा करार आहे,”असे ते पुढे म्हणाले.
टाटा मेमोरिअल केंद्र आणि कर्करोगावरील उपचार पुरविणारी इतर केंद्रे यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करत आसियानमधील भारतीय राजदूत जयंत खोब्रागडे म्हणाले, “बहुतांश कर्करोग रुग्ण हे देशाच्या विकासात प्रत्यक्ष योगदान देणारे आहेत आणि म्हणून एका अर्थाने त्यांनी केलेली ही देशसेवाच ठरते. त्यांच्या आयुष्याचा कालावधी विस्तारणे ही मानवतेची मोठी सेवा आहे.”
टाटा मेमोरिअल केंद्राने ‘केवट’असे नाव असलेला एक वर्ष कालावधीचा नेव्हिगेशन इन ऑन्कॉलॉजी हा पदवीपश्चात पदविका अभ्यासक्रम सुरु केला आहे. या उपक्रमासाठी केंद्राने आरोग्य सुविधा क्षेत्रातील मनो-सामाजिक शिक्षण देणासाठी टीआयएसएसअर्थात टाटा समाज विज्ञान संस्थेशी सहकारी संबंध प्रस्थापित केले आहेत तर टाटा मेमोरिअल केंद्र या अभ्यासक्रमात वैद्यकीय पैलूंचे शिक्षण देणार आहे. टाटा मेमोरिअल केंद्र आणि टीआयएसएस यांच्यातर्फे संयुक्तपणे ही पदविका दिली जाईल.
याच पदविका अभ्यासक्रमात इंडोनेशियातील रुग्णांच्या गरजेनुसार थोडे बदल केले आहेत. इंडोनेशियासाठीच्या प्रशिक्षण केन्द्री कार्यक्रमात मिश्र शैक्षणिक नमुना तयार केला असून त्यात टाटा मेमोरिअल केंद्र येथून दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन व्याख्यानांचा आणि प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. यानंतर, प्रशिक्षणात सहभागी झालेल्या इंडोनेशियातील रुग्णालयांमध्ये तेथील प्रशिक्षणार्थींना तज्ञांच्या देखरेखीखाली प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाईल. हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना टाटा मेमोरिअल केंद्र आणि टीआयएसएस यांच्यातर्फे संयुक्त पदविका प्रदान करण्यात येईल.
COVID 4 : कोरोनाची चौथी लाट, यावेळी पोटाशी संबंधित ही लक्षणे दिसून येतील
World Oral Health Unified Week: तुमचे दात दुखत आहेत? जाणून घ्या कारण…