मुंबई : शिवसंग्रामचे नेते माजी आमदार विनायक मेटे(Vinayak Mete) यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर(Mumbai Pune Express Highway) अपघात होऊन या अपघातात विनायक मेटे(Vinayak Mete) यांचे दुर्दैवी निधन झाले.
पहाटे पाच च्या सुमारास माडप बोगद्याजवळ(madap tunnel) त्यांच्या गाडीने एका ट्रकला मागून धडक दिल्याने त्यांची गाडी त्या ट्रक च्या बंपर मध्ये अडकली आणि फरफटत गेली , यात मेटे गंभीर जखमी झाले, त्यांना कामोठे येथील mgm रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मेटे यांच्या गाडीचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असे पोलिसांनी सांगितले.
आज दुपारी मराठा आरक्षण विषयक बैठकीसाठी ते बीड हून मुंबईत येत होते, मेटे यांच्या निधनाचे वृत्त समजताच बीड मधील त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच आक्रोश केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींनी मेटे यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मराठवाड्यातील एक उमदे नेतृत्व , मराठा समाजासाठी संघर्ष करणारे व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यपालांची विनायक मेटे यांना श्रद्धांजली
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांचे सामाजिक कार्य तसेच उपेक्षित समाज घटकांच्या विकासातील योगदान मोठे आहे. दिवंगत श्री मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.