बीडच्या रस्त्यावर सुरु असणारे गँगवार आता जेलमध्ये सुरु!;पोलीस खाते आणि गृहविभाग काय करत आहे ?

मुंबई : महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये तर कायद्याचे नाही गुंडाराज आले आहे अशी परिस्थती आहे. बीडच्या रस्त्यावर सुरु असलेले गँगवॉर आता जेलमध्ये पोहोचले आहे. पोलीस आणि गृहविभाग काय करत आहे? असा संतप्त सवाल करून देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी गृहखात्याचा मोह सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

फडणवीसांनी गृहविभागाचा मोह सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

या सदंर्भात बोलताना हर्षवर्धन सपकाळ(Harsh Vardhan Sapkal) म्हणाले की, महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. पण सरकारला याचे काही गांभीर्य आहे असे दिसत नाही. राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली, सरकारी आशिर्वादाने वाळू, जमीन, पवनचक्की, मटका, दारू, कोळसा माफिया तयार झाले आहेत. ते दररोज पोलिसांना आव्हान देत आहेत. खून, दरोडे बलात्काराच्या घटना दररोज घडत आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढूनही आरोपींना अटक होत नाही. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करावे लागते ही राज्याला शरम आणणारी बाब आहे.

भाजप युतीचे सरकार येण्याआधी देशभरात महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे उदाहरण दिले जायचे. महाराष्ट्र शांत आणि प्रगतीशील राज्य असल्याने मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येत होते. त्यामुळे महाराष्ट्राची चौफेर प्रगती झाली. पण गेल्या काही दिवसांत सरकारच्या आणि विशेषत: गृहविभागाच्या गलथानपणामुळे महाराष्ट्राच्या नावाला काळिमा लागला असून महाराष्ट्राची तुलना उत्तरेतल्या राज्यातल्या जंगलराजसोबत होऊ लागली आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदारच बीडचा बिहार, तालिबान झाला आहे असे सांगत आहेत. बीडमध्ये आका, खोक्या सत्ताधा-यांच्या आशिर्वादानेच उदयास आले आहेत. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारांची मजाल इतकी वाढली आहे की आता बीडच्या जेलमध्येच कराड आणि गित्ते या दोन टोळ्यांमध्ये गँगवार(Gangwar) सुरु झाले आहे. त्यामुळेच बीड कारागृहातून महादेव गित्तेसह काही आरोपींना छत्रपती संभाजी नगरच्या हर्सूल कारागृहात हलवल्याचे वृत्त येत आहे. आता बीडचे जेलही सुरक्षित नाही. ही चिंतेची बाब आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *