उद्याच होणार सरकारचा निर्णय…

मुंबई :  राज्यातील सध्याच्या राजकीय अस्थैर्यावार उद्याच फैसला होणार असून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना उद्याच आपले बहुमत विधानसभेत सिध्द करायला सांगितले आहे, तशा सूचना त्यांनी विधिमंडळ सचिवांनाही दिल्या आहेत.

गेल्या वीस तारखेपासून राज्यात सुरु असलेला सत्तासंघर्ष आता विधानसभेत प्रत्यक्ष बहुमत सिद्ध करण्याच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत राहायचे नाही अशी भूमिका घेऊन दोन तृतीआंश बहुमत असल्याचा दावा आपल्या पक्षात केला आहे. मात्र सुरुवातीला आपल्याला पदाचा मोह नाही असे सांगणाऱ्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. यामुळे गेले नऊ दिवस राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.

शिवसेनेच्या दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे होत असून ते सिध्द करण्याची वेळ आता राज्यपालांनी आज दिलेल्या आदेशामुळे आली आहे.मुख्यमंत्री आणि विधिमंडळ सचिव या दोघांनाही राज्यपालांनी असे पत्र आज पाठविले आहे.

आपल्याला सात अपक्ष आमदारांनी ई मेल द्वारे आणि विधानसभेच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी प्रत्यक्ष भेटून पत्राद्वारे विद्यमान सरकारने बहुमत गमावले असल्याचे सांगत बहुमत चाचणीची मागणी केल्याचे राज्यपालांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. प्रसारमाध्यमांच्या द्वारे ही राज्यातील राजकीय स्थितीची माहिती आपल्याला मिळाली आहे, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कार्यालय आणि घरांवर हल्ले होत असल्याचे दिसून आले आहे असे राज्यपाल आपल्या आदेशात नमूद करतात.

या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या कडेकोट बंदोबस्तात उद्याच म्हणजे ३० जून २०२२ रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विधानसभेचे अधिवेशन बोलावून त्यात सरकारने आपले बहुमत आणि विश्वासदर्शक ठराव संमत करून घ्यावा , कोणत्याही परिस्थितीत अधिवेशन तहकूब करू नये, प्रत्येक सदस्याने जागेवर उभे राहून आपले मत नोंदवावे , त्याचे त्रयस्थ यंत्रणेद्वारे चित्रीकरण करून आपल्याला सादर करावे असे राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

दरम्यान आपले आमदार उद्या मुंबईत उपस्थित होतील असे एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले आहे तर सर्वोच्च न्यायालयात आम्ही याला आव्हान देऊ असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Social Media