मुंबई : तुमच्या गावच्या सरपंच पदासाठीही तोच फोटो, पंतप्रधान पदासाठीही तोच फोटो आणि राज्याच्या निवडणूकीतही तोच फोटो त्यामुळे आम्हाला कळत नाही की हा देशाचा पंतप्रधान आहे की, गावचा सरपंच आहे अशी बोचरी टिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. ते दूरदृश्त माध्यमांतून कोल्हापूरच्या पोटनिवडणुक प्रचाराच्या सांगतेच्या सभेत बोलत होते.
मोदी सगळ्याच निवडणुकांच्या पोस्टरवर
मुख्यमंत्र्यानी शिवसेना हाच ख-या हिंदुत्वाचा पक्ष असल्याचे सांगताना आमच्या बॅनरवर हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा कायमची आहे. मात्र भाजपला हिंदुत्वाचा नारा देणा-या लालकृष्ण अडवाणी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमा त्यांच्या कोणत्याच बँनरवर का नाहीत असा सवाल करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी गल्ली पासून दिल्ली पर्यंतच्या सगळ्याच निवडणुकांच्या पोस्टरवर असल्याबाबत बोचरी टिका केली.
हिंदू हृदयसम्राट म्हणून फक्त एकच
मनसेच्या राज ठाकरे यांचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला ते म्हणाले की, मध्यंतरी काही जणांनी स्वत:ला हिंदू हृदयसम्राट म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी त्यांना झिडकारले त्यामुळे त्यांनी तो अखेर नाद सोडला असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. हिंदू हृदयसम्राट म्हणून फक्त एकाच व्यक्तीचे नाव पुढे येत ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच असेही त्यांनी सांगितले.
जयश्री जाधव यांना सच्चा शिवसैनिक मतदान करेल
मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या चार भिंतीत अमित शाहने मला वचन दिले. ते वचन तुम्ही तोडलात. का तोडलात याचे उत्तर तुम्ही का देत नाही असा सवाल करत भाजपाला ४० हजार मते मिळाली, शिवसेनेला ४७ हजार मते शिवसेनेला मिळाली आणि काँग्रेसला ९१ हजार मते मिळाली. मग तुमची ४० हजार मते कोणाला गेली असा सवाल करत छुपे पणाने तुम्ही तेव्हा काँग्रेसलाच मते दिल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र आम्ही जे काही करतो ते खुले पणाने करतो. आम्हाला तुमच्या सारखे छुपेपणाने करण्याची गरज नाही असे सांगत काँग्रेसला आम्ही पाठिंबा दिलेला असून जयश्री जाधव यांना सच्चा शिवसैनिक मतदान करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त करत प्रेमाने आलात तर अफजलखानाप्रमाणे गळाभेटही देवू पण जर अफझलखानाप्रमाणे पाठीत वार कराल तर समोर आम्ही हल्ला केल्याशिवाय राहणार नसल्याचा इशाराही त्यांनी भाजपाला यावेळी दिला.
खरा भगवा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा
ते म्हणाले की, शिवसेनेने हिंदूत्व सोडले नाही खरेतर आम्ही तुम्हाला सोडले हिंदूत्वाला सोडले नाही. मी तेव्हाही हिंदूच होतो आणि आजही हिंदू आहे. आमचे हिंदूत्व हे हिंदू अडचणीत जेव्हा असतील तेव्हा धावून जाण्याचे हिंदूत्व आहे. त्यासाठी सारखे आम्हाला सांगावे लागत नाही असे ते म्हणाले. ते म्हणाले की आम्ही आमचा भगवा कधी बद लला नाही बदलणार नाही. हा तुमच्या एकट्याचा भगवा काही खरा भगवा नाही तर तो नकली, खोटा भगवा असल्याची टीकाही त्यांनी भाजपावर केली. ते पुढे म्हणाले खरा भगवा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा, वारकरी संताचा असून त्याचेच अनुकरण शिवसेना करत असल्याचे त्यांनी सांगितले.