मुंबई : भारतीय जनता पक्षात वर्षभरापूर्वी दाखल झालेल्या आयारामांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात अद्याप सामावून घेण्यात आले नसल्याने या आयारामांना घरवापसीचे वेध लागले आहेत. येत्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत पक्षात नव्याने आलेल्या नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासाने जबाबदारी देण्याचे संकेत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पक्षात येत्या काळात बंडखोरीचे पिक मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता गृहित धरून जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यानी आता पासून समतोल साधण्यासाठी संवाद वाढविण्यावर भर द्यावा असे मार्गदर्शन आज झालेल्या पक्ष पदाधिका-यांच्या दृकश्राव्य बैठकीत करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
भारतीय जनता पक्षाचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आज पक्षाच्या सर्व जिल्हा प्रभारींची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. यावेळी विविध संघटनात्मक विषयांवर यावेळी चर्चा झाली. त्यानंतर दुसरी ऑनलाईन माध्यमातील बैठक विभागप्रमुखांची झाली. सकाळच्या सत्रात झालेल्या या दोन्ही बैठकींना महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवि, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, ओमप्रकाश धुर्वे, जयभानसिंग पवैया आणि विविध नेते, पदाधिकारी यांच्यासमवेत झाली.
या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षात सत्तेच्या आशेने वर्षभरापूर्वी दाखल झालेल्या अनेकांची आता निराशा झाली असून त्यांच्या धुसफूस सुरू झाली आहे. पक्षाला आगामी काळात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना सामोरे जायचे असल्याने त्या निमित्ताने आयारामांची ही धुसफूस बंडखोरीत बदलणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना आज पदाधिका-यांच्या बैठकीत देण्यात आल्याचे समजते. त्यासाठी स्थानिक पदाधिका-यांनी पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांसोबत समन्वय राखून येत्या काळात पक्षाला विजय मिळवून देवू शकतील अश्या कार्यकर्ता, पदाधिका-यांसोबत बूथ, प्रभाग आणि तालुका (ब्लॉक) स्तरांवर बैठका घ्याव्या अश्या सूचना देण्यात आल्या आहेत. पक्षाला येत्या काळात एकट्याने निवडणुकांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने आता पासून तयारीला लागण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या असल्याचे या सूत्रांनी सांगितले.
Tag-The rebellion/Ayaram/Devendra Fadnavis