नाशिक : सकाळचे अाल्हाददायक वातावरण…दाट धुके…हवेत गारवा अन् गुलाबी थंडी त्यात ग्रंथदिंडीचा उत्साह, महाराष्ट्राच्या कला, संस्कृती आणि परंपरेचे दर्शन, भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन अन् टाळ-मृदंगाच्या तालावर अखंड हरिनामाचा गजरासह साहित्याची पंढरीत सारस्वतांच्या महामेळ्याने सकाळचे वातावरण भारावून गेले. काेराेनाचे सावट आणि पूर्वसंध्येलाच बरसलेला पाऊस असे सगळे अडथळे पार करत अखेर कालपासून नाशिकमध्ये मराठी साहित्य संमेलन सुरू झाले. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीत जवळपास हजारापेक्षा जास्त िवद्यार्थी अाणि साहित्य रसिकांनी सहभाग घेतला. अाकर्षक चित्ररथांनी उपसि्थतांचे लक्ष वेधले.
ग्रंथ दिंडीला सुरुवात करण्यापूर्वी पालकमंत्री आणि स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी तात्यासाहेब तथा कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला अभिवादन करून ग्रंथदिंडीला सुरुवात केली.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, उपाध्यक्ष तथा कृषीमंत्री दादाजी भुसे व मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते दिंडींचे पुजन करण्यात आले. कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून सुरू झालेल्या दिंडीचे नाशिककरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. ग्रंथदिंडीच्या पालखीमध्ये भगवत गिता, ज्ञानेश्वरी व कुसुमाग्रजांची साहित्यसंपदा ठेवण्यात आली होती. यावेळी नाशिक पोलीस विभागामार्फत पोलीस व जनता यांच्यातील सुसंवाद वाढवा यासाठी जनजागृतीपर काढण्यात आलेल्या रॅलीतून महाराष्ट्र राज्य पोलिसांचे मुखपत्र असलेल्या दक्षता या मासिकाची माहिती देण्यात आली.
‘राम कृष्ण हरी’, ‘ज्ञानबा तुकाराम,’ तुकारामाचा जय घोष व हरी गजर ऐकण्यात आला. ग्रंथ दिंडीच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्राचे प्रसिद्ध झिम्मा फुगडीने सर्वानाच मंत्रमुग्ध केले. तसेच मुलामुलींनी लेझीम खेळत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या ग्रंथदिंडीत पालकमंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष भुजबळ वीणा वादन करीत उपस्थितांना भुरळ घातली. या ग्रंथदिंडीत विविध विषयांवरील चित्र रथ असून शालेय विद्यार्थ्यांचा ग्रंथदिंडीत सहभाग होता. त्याचबरोबर नाशिककरांनी आकर्षक रांगोळ्या रेखाटून दिंडी मार्ग सजविला होता. आमदार नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर यांनादेखील रामकृष्ण हरीचा गजर करत ठेका धरण्याचा माेह अावरला नाही.
एकीकडे साहित्य संमेलनाचा जल्लोष तर दुसरीकडे गुलाबी थंडीने ही नाशिककरांना भुरळ पाडली आहे. या गुलाबी थंडीत नाशिककरांची सुरेख सकाळ एक अवलिया करतोय. सुनील बच्छाव, हे गोल्फ क्लब मैदानावर बसून सुंदर बासरी वादन करत असून याचा आनंद नाशिकची साहित्यमय सकाळ घेतांना दिसून येत आहे.
या ग्रंथदिंडीत मुला-मुलींनी मल्लखांबाचे चित्तथरारक कसरती करून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. तर इतिहासकालीन दानपट्टा, तलवारबाजी इत्यादी ऐतिहासिक खेळाचे दर्शन सुद्धा यावेळी झाले.
या मार्गाने निघाली दिंडी
टिळकवाडीतून कुसुमाग्रज निवासस्थानावरुन सुरु झालेली ही ग्रंथदिंडी महापौर बंगल्यावरुन रेमंड सिग्नलला उजवीकडे वळली. त्यानंतर जुना सीबीएस सिग्नल ओलांडून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावरुन ती शिवाजी रोडवर आली. तिथून नाशिक जिमखाना, सागरमल मोदी शाळा, सारडा कन्या शाळा, परशुराम सायखेडकर नाट्यगृह वरून सार्वजनिक वाचनालय येथे या दिंडीने विसावा घेतला. त्यानंतर बसने ही दिंडी संमेलनस्थळी रवाना झाली.
साहित्य संमेलनाचा शुभारंभ करणाऱ्या या ग्रंथदिंडीच्या सोहळ्यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, विधानसभेचे उपाध्यक्ष तथा संमेलनाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार पंकज भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी लितीन मुडांवरे, संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले, संमेलन समन्वयक समीर भुजबळ, निमंत्रक-प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगांवकर, संमेलनाच्या सर्व समितींचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकुर, सर डॉ. मो. स. गोसावी, प्राचार्य प्रशांत पाटील यांच्यासह लेखक, कवी, साहित्यिक, विद्यार्थ्यांचे लेझीम पथक व साहित्यप्रेमींनी उपस्थिती लावली होती.