नवी दिल्ली : मधुमेहाचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी शिफारस केलेली पहिली गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम. आता युनिव्हर्सिटी ऑफ ईस्टर्न फिनलंडच्या अभ्यासात, शास्त्रज्ञांनी टाइप-2 मधुमेहाविरूद्ध(type-2 diabetes) नियमित शारीरिक हालचालींची भूमिका अधोरेखित केली आहे.
‘मेटाबोलाइट्स’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासादरम्यान असे आढळून आले की, नियमित व्यायामामुळे शरीरातील चयापचय प्रक्रियेत अनेक महत्त्वाचे बदल होतात. यातील अनेक बदल टाइप २ मधुमेहाचा धोका कमी करतात.
अभ्यासात सहभागी असलेल्या सुमारे 7,000 लोकांवर आठ वर्षे लक्ष ठेवण्यात आले. शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय पुरुषांच्या तुलनेत कठोर व्यायाम करणाऱ्यांमध्ये टाइप २ मधुमेहाचा धोका ३९ टक्के कमी असल्याचे आढळून आले. सहभागींची शारीरिक क्रिया एकूण 198 चयापचय पातळीशी संबंधित होती.
अभ्यासात असे आढळून आले की, नियमित व्यायामाचा चयापचय प्रक्रियेवर निरोगी आहारासारखाच परिणाम होतो. शारीरिक हालचालींमुळे इन्सुलिन स्राव देखील सुधारला.
अभ्यासाच्या निष्कर्षांच्या आधारे शास्त्रज्ञांनी सांगितले की, ज्यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस व्यायाम केला त्यांना टाईप-२ मधुमेहाचा धोका कधीही व्यायाम न करणाऱ्यांपेक्षा ३० टक्के कमी असतो.