मुंबई : देशभरात शनिवारी कोरोना विषाणूवरील लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र अॅपमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने लसीकरणाला स्थगिती देण्यात आली होती. आज पुन्हा लसीकरणाला सुरुवात करण्यात आली असून अॅपमध्ये सुधारणा झाल्याचे निदर्शनास आले. लसीकरणाला प्रतिसाद कमी असला तरी हळू हळू प्रतिसाद वाढेल असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित राज्यात शनिवारी कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी लसीकरणात सहभागी होणाऱ्यांना कोविन अॅपवर नोंदणी केल्यानंतरही मोबाईलवर संदेश गेले नसल्याचे निदर्शनास आले. पालिकेने लसीकरणाला काही तास बाकी असताना संदेश पाठवून, फोन करून लसीकरणाला लाभार्थ्यांना बोलावले होते. लसीकरण केल्यावर अॅपवर ऑनलाईन नोंदणी होत नसल्याने ऑफलाईन नोंद करण्यात आली. केंद्र सरकारने ऑफलाईन लसीकरणाची नोंद करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राज्याच्या टास्क फोर्स मार्फत केंद्र सरकारला करण्यात आली. केंद्र सरकारने ऑफलाईन नोंदणी करण्यास नकार दिल्याने राज्यात रविवार आणि सोमवार असे दोन दिवस लसीकरणाला स्थगिती देण्यात आली.
मुंबईमधील पालिकेच्या ९ केंद्रांवर ४० बुथवर आज पुन्हा लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. आज ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस द्यायची आहे, त्यांना कालच अॅप वरून संदेश पाठवण्यात आले, पालिकेनेही आपल्या वॉर्ड वॉर रूममधून संदेश पाठवले, फोनही करण्यात आले. लसीकरण केंद्रावर नावाची यादी पाहून लसीकरण केल्यावर त्यांचे नाव कोविन अॅपमध्ये नोंद होत असल्याचे राजावाडी रुग्णालयातील लसीकरणा केंद्रावर दिसून आले. शनिवार प्रमाणे आजही लस घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद कमी प्रमाणात दिसला . इतर लोकांनी लस घेतल्यावर त्यांना काही झाले नाही, हे पाहिल्यावर हळू हळू लसीकरणाचे प्रमाण वाढेल असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
एका बूथवर दिवभरात १०० लाभार्थ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. मात्र शनिवारी पहिल्या दिवशी ५० टक्केही प्रतिसाद मिळालेला नाही. याची खबरदारी म्हणून आज लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यापैकी जितके लाभार्थी येतील त्यांना लस दिली जाणार आहे असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. आतापार्यंत कोणालाही लस घेतल्यावर दुष्परिणाम झाल्याचे निदर्शनास आले नसल्याचे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
Tag-Vaccination/resumes in Mumbai