वंदेमातरम्..

आज गांधी जयंतीच्या दिवशी सरकारी कार्यालयांतून “हेलो” ऐवजी “वंदेमातरम”(Vande Mataram) ऐकायला मिळणार हे ऐकूण छाती भरून आली. खूप अभिमान वाटला. इंग्रजीत सांगायचं तर “प्राउड फील” होतो. का नाही वाटणार असं? निर्णयच तसा आहे.
हा राष्ट्रीयत्व जागवणारा हा उदघोष आहे.
वंदेमातरम..१८७५ साली बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं हे गीत, त्याकाळात स्वातंत्रासाठी लढणाऱ्यांना उर्जा देण्याचं काम करत होतं. हे आपलं राष्ट्रीय गीत आहे.
एकेकाळी “वंदेमातरम” हा आमचा मंत्र होता. स्वातंत्र्य चळवळीत “वंदेमातरम” हा शब्द परकीय शक्ती विरुद्ध शस्त्रा सारखे काम करायचा.
त्यावेळी हे गीत इस्लाम विरोधी नव्हतं किंवा हिंदुत्ववादाचं प्रतिकही नव्हतं. सर्वजण् वंदे मातरम त्याच जोशात म्हणायचे.
“हे माते मी तुला प्रणाम करतो”, असा याचा सरलार्थ.
“वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्..”
सन १९४८ ला प्रदर्शित झालेला चित्रपट “वंदेमातरम”. देशप्रेमाने भरलेल्या तरुणांनी एकत्र येवून स्वातंत्र्याची शपथ घेतली. गदिमांच्या सिद्ध लेखनीतून प्रसवलेले हे गीत. सुधीर फडके यांनी संगीत बद्ध केलेलं आणि स्वत: गायिलेलं (स्वरबद्ध केलेलं) हे गीत आहे. या वेळी गदिमा, पूल आणि बाबूजी, एकत्र आले आणि ही अजरामर कलाकृती निर्माण झाली.
मला अधिक आनंद होण्याच कारण काही वेगळच आहे.
“वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्..” हे गीत मी शाळेत असतांना स्पर्धेत गायलो आहे. बक्षीस मिळवलं आहे. आकाशवाणी नागपूरला “युवावाणी” कार्यक्रम सादर करतांना अनेक वेळा, तरुण श्रोत्यांना ऐकविलेलं आहे.
आज शासनाने अध्यादेश काढला आणि “ वंदेमातरम्” म्हणणे अनिवार्य केलं.
भंडारा शहरात दोन व्यक्ती अशा होत्या ज्या कधीही “नमस्कार” किंवा “हेलो”, न म्हणता, “वंदे मातरम” असं अभिमानानं म्हणायच्या. एक होते “लोकवाणी” या साप्ताहिकाचे सर्वेसर्वा श्री अनंत पंडितराव आणि दुसरे, धावपटू श्री भास्करराव तिजारे, माझे वडील. स्व. श्री अनंत पंडितराव हे १९५० पासून भंडारा शहरात “ लोकवाणी” हे साप्ताहिक चालवायचे. मला लिखाणासाठी प्रवृत्त करणारे ते माझे गुरूच. ते नेहमीच प्रत्यक्ष भेटल्यावर किंवा दूरध्वनी वरून “वंदेमातरम” असच म्हणायचे.
दुसरे स्व. श्री भास्करराव तिजारे, माझे वडील. ते सुद्धा नेहमी “वंदे मातरम्” नेच संभाषणाची सुरवात करायचे. वंदेमातरमवाले गुरुजी म्हणूनच त्यांची ओळख होती. आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. “राष्ट्र सर्वोपरी” हे म्हणून नव्हे तर ते “अंत:करणात असावं लागतं, हेच. खरं. मग कृती ही आपसुकच होते. महाराष्ट शासनचं अभिनंदन. आज पूर्व स्मृतींना उजाळा मिळाला. चला तर यानंतर आपणही म्हणूया “वंदेमातरम”.

 

श्रीकांत भास्कर तिजारे
भंडारा ९४२३३८३९६६ / ७०३८८३९७६२

Social Media