वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने एकनिष्ठ व लढवय्या कार्यकर्ता गमावला!

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा शोकसंदेश

मुंबई : नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण(Vasantrao Chavan) यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने निष्ठावंत लढवय्या कार्यकर्ता आणि उत्तम लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शोकभावना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केल्या आहेत.

खा. चव्हाण यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून ते म्हणाले की, अत्यंत कठिण काळात ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले व लोकांच्या पाठिंब्यावर नांदेड लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते.

खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने काँग्रेसचा लढवय्या नेता हरपला : बाळासाहेब थोरात

गावचे सरपंच ते लोकसभेचे खासदार असा राजकीय प्रवास असणाऱ्या वसंतराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याच्या समाजकारण, सहकार, शिक्षण, कृषी, अशा विविध क्षेत्रात योगदान देताना सामान्य माणसाकरता आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षातील जनसामान्यांचा आधारवड असलेला लढवय्या नेता हरपला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, खासदार चव्हाण यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आहे. वसंतराव चव्हाण यांनी सर्वांना सोबत घेत जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान दिले. गावचा सरपंच, बाजार समितीचे सभापती, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन ,विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य अशी त्यांची कारकीर्द राहीली.

पुरोगामी विचार आणि काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहताना त्यांनी अत्यंत अडचणीच्या काळामध्ये लोकसभा लढवली. नांदेड मधील मोठमोठे नेते काँग्रेस सोडून गेले तेव्हा मात्र सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन खिंड लढवणाऱ्या या लढवय्याने नांदेड मधून मोठा विजय मिळवला.

एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व असलेल्या खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने सर्वसामान्यांसाठी सातत्याने संघर्ष करणारा काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत पाईक, आपला एक सहकारी आणि संघर्षशील लढवय्या नेता हरपला असून त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. या कठिण प्रसंगी आम्ही सर्वजण चव्हाण कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत असे थोरात म्हणाले.

जनसामान्यांच्या हितासाठी लढणारे अनुभवी व मनमिळावू नेतृत्व काळाच्या पडद्याआड!

खा. वसंतराव चव्हाण यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली!

आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून जनसामान्यांच्या हितासाठी लढणारे नांदेड लोकसभेचे खा. वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने एक अनुभवी व मनमिळावू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.

खा. चव्हाण यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून चेन्नीथला म्हणाले की, गावचा सरपंच, आमदार, लोकसभा खासदार अशी चव्हाण यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द राहिली आहे. मनमिळावू स्वभाव, प्रचंड लोकसंग्रह, जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण आणि ते सोडवण्याची तळमळ यामुळे त्यांना कायम जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला. लोकसभा निवडणुकीत मोठे नेते पक्ष सोडून गेले असता त्यांनी कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष संघटना मजबूत करून मोठा विजय मिळवला. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असून आपण सहकारी मित्र गमावला आहे.

खा. वसंतराव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून काँग्रेस पक्ष चव्हाण कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे असे चेन्नीथला म्हणाले.

खासदार वसंतराव चव्हाणांच्या निधनाने काँग्रेस विचाराचा निष्ठावान पाईक हरपला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा शोक संदेश

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. वसंतराव चव्हाण यांनी प्रतिकूल परस्थितीत एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवला. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काँग्रेस विचार सोडला नाही, त्यांच्या निधनाने अनुभवी लोकप्रतिनिधी व काँग्रेस विचारांचा एक निष्ठावान पाईक हरपला आहे, अशा शोक भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

Social Media