मुंबई दि १३(किशोर आपटे) : राज्य विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी येत्या २७ तारखेला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या रिक्त जागांमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा तर भाजपला तीन जागांवर उमेदवार देता येणार आहेत. संख्याबळाचा विचार केला तर विरोधीपक्षाकडे एकही जागा निवडून आणता येईल असे संख्याबळ नसल्याने ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता आहे.
विधानसभा(vidhansabha) सदस्यांमधून विधानपरिषदेवर नियुक्त झालेल्या पाच सदस्यांची २०२५च्या सार्वत्रिक निवडणूकीत थेट विधानसभेत नियुक्ती झाल्याने त्यांच्या उर्वरित रिक्त कालखंडासाठी असलेल्या जागेवर भाजपकडून नांदेड येथील खासदार अशोक चव्हाण(AshokChauhan) यांचे निष्ठावंत अमर राजूरकर, वर्धा येथील भाजपचे बंडखोर दादाराव केचे, आणि कोकणातील अनेक वर्ष प्रतिक्षेत असलेले माधव भांडारी यांच्या नावांची शिफारस भाजपने केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याचे सांगण्यात येत आहे. तर शिवसेनेकडून नुकतेच राजापूर मतदारसंघातून पक्षात आलेले राजन साळवी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून वांद्रे मतदारसंघातून विधानसभेत पराभूत झालेले झिशान सिध्दीकी यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे. या पाचही जागी बिनविरोध निवड जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपमध्ये या विधानपरिषदेच्या तीन जागांमध्ये जो कार्यकाळ आहे तो केवळ १६ ते १९ महिन्यांचा असल्याने सध्या स्थानिक राजकीय समिकरणांचा विचार करत उमेदवारी देण्यात आल्याचे मानले जात आहे. त्यात दादाराव केचे यांच्या विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्याचे स्विय सहायक असलेल्या सुमीत वानखेडे यांना आमदारकी देताना केचे यांनी बंडखोरी केली होती त्यावेळी केंद्रीय नेत्यांनी त्याना विधानपरिषद सदस्यत्व देण्याचा शब्द दिल्याचे सांगण्यात येत आहे. तर नांदेड येथील राजूरकर यांच्याकडे चव्हाण यांच्यासोबत पक्षात येताना दिल्या गेलेल्या शब्दामुळे हे पद चालून आल्याचे मानले जात आहे. मांधव भांडारी हे २००६ पासून पक्षात प्रवक्ते म्हणून कार्यरत निष्ठावंत नेते मानले जातात, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकात कोकण मुंबई आणि पुण्यात त्यांच्या उमेदवारीमुळे निष्ठावंत आणि संघ विचारांच्या कार्यकर्त्यांना बळ मिळेल असे मानले जात आहे.
जाणकार सूत्रांच्या माहितीनुसार येत्या काळात कोकणात स्थगित केलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाला बारसू येथे गती देण्यासाठी राजन साळवी यांच्याकडे आमदारकी चालून आली असल्याचे सांगण्यात येत आहे. साळवी यांनी ठाकरे गटात असताना या प्रकल्पासाठी जनमतसंग्रह करण्यात महत्वाची भुमिका बजावली होती. त्यांना बळ दिल्यास प्रकल्पाला विरोध करणा-या ठाकरेगटाला शह देणे महायुतीला शक्य होणार असल्याचे मानले जात आहे. तर मुंबइ महापालिका निवडणुकीत नबाब मलिक यांना सोबत घेवून भाजपासह निवडणूक लढणे सोयीचे नसल्याने नवा चेहरा म्हणून झिशान सिध्दीकी यांचा राष्ट्रवादी अजीत पक्षाला फायदा होणार आहे. याशिवाय सना मलिक आणि नबाब मलिक हे देखील पूर्व उपनगरात पक्षाला बळ देवू शकतील. असे मानले जात आहे.