मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठक घेऊन विधानसभा अध्यक्ष पदाचा अर्ज न भरण्याबाबत निर्णय घेतला. त्या बदल्यात आम्ही विरोधी पक्षनेते पद आणि विधानसभा उपाध्यक्ष पद आम्हाला मिळावं, यासाठी मुख्यमंत्र्यांसमोर प्रस्ताव ठेवल्याची माहिती शिवसेना गटनेते भास्कर जाधव यांनी दिली आहे.
दरम्यान, १९९९ पासूनची परंपरा होती की सत्ताधाऱ्यांकडे विधानसभा अध्यक्षपद तर विरोधकांकडे विधानसभेचे उपाध्यक्ष पद असावं. भाजप आणि शिवसेनेच्या काही चुकांमुळे ही परंपरा खंडित झाली होती. त्यामुळे ही परंपरा पुन्हा सुरू करावी आणि उपाध्यक्ष पद मिळावं अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर केली असल्याची माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी दिली आहे. महाविकास आघाडीचे नेते नाना पटोले, भास्कर जाधव, अस्लम शेख आणि विजय वडेट्टीवार यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. याभेटीनंतर ते बोलत होते.
राज्य चालवण्यासाठी जेवढे सत्ताधारी महत्त्वाचे असतात, तेवढेच विरोधक महत्त्वाचे आहे. त्यामुळेच विरोधी पक्षनेते पद आम्हाला मिळावं, असं आम्ही मुख्यमंत्र्यांना बोललो. विरोधी पक्ष नेता निवडीसाठी संख्याबळ महत्त्वाचं नाही. हा मुद्दा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पटवून दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्या दोन प्रस्तावासंदर्भात सकारात्मक आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर यासंदर्भात निर्णय होईल असेही ते म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष बिनविरोध व्हावा ही परंपरा राहिली आहे. विरोधीपक्ष नेता यासंदर्भात व्यवस्था असली पाहिजे. दिल्लीत आप ने भाजपचा विरोधी पक्षनेता तयार केला होता. ही भूमिका आम्ही मांडली. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.
दुसऱ्यांदा राहुल नार्वेकर यांच्याकडे अध्यक्षपद
पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद जाणार आहे. फक्त नावाचा घोषणा होणच बाकी आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याची दुपारी १२ वाजेपर्यंत मुदत होती. या काळात महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळं राहुल नार्वेकर हे बिनविरोध अध्यक्ष होणार आहेत. नार्वेकर हे दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष होणार आहेत. दरम्यान, राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले आहे. नार्वेकर सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही? अशी चर्चा सुरु असताना राहुल नार्वेकर यांनी वक्तव्य केले आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण असेल यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांचा अधिकार असतो. नियमात ज्या गोष्टी असतील त्याद्वारे सगळं होत असते असे राहुल नार्वेकर म्हणाले. माझ्याकडे गोष्टी आल्यास आम्ही विचार करुन निर्णय घेऊ. २८८ आमदारांना न्याय दिला नाही तर जनतेबरोबर अन्याय होतोय असे वाटेल. संसदीय लोकशाहीसाठी सर्वांना न्याय देणं फार महत्त्वाचं असल्याचे नार्वेकर म्हणाले.
पुढील कार्यकाळात डिजिटलायझेशन. सेंन्ट्रल व्हिस्टा संदर्भात लवकरच विचार करु, नवीन विधान भवनासंदर्भात निर्णय विचाराधीन असल्याची माहिती देखील नार्वेकरांनी दिली. शिवसेना ठाकरे गटाचे दोन आमदार शपथविधीला अनुपस्थित होते. यामध्ये वरुण सरदेसाई हे एक आहेत. ते पूर्वनियोजित दौऱ्यामुळे मुंबई बाहेर असल्या कारणाने शपथ घेऊ शकले नाहीत. तर मनोज जामसुतकर यांची तब्येत ठीक नसल्याने आणि रुग्णालयात उपचार घेत असल्याने शपथ घेऊ शकले नाहीत असे नार्वेकर म्हणाले.