विधानसभा समालोचन दि. १८ डिसें. २४

किशोर आपटे : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तीस-या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभाराच्या प्रस्तावावरील चर्चेचा दुसरा दिवस होता. त्याशिवाय नियम २९३ अन्वये सत्ताधारी पक्षांचा चर्चेचा प्रस्ताव औचित्याचे मुद्दे याशिवाय परभणी येथे दि ११ डिसेंबर रोजी घडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्याच्या घटनांबाबत नियम १०१ अन्वये चर्चा अशी भरगच्च कामकाजपत्रिका होती, हेच आजच्या कामकाजाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

सकाळी अकरा वाजता कामकाजाची सुरूवात होताच कॉंग्रेस चे सदस्य नाना पटोले यांनी माध्यमातून उपमुख्यमंत्री अजीत पवार नॉट रिचेबल असल्याबाबत वृत्त दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की सभागृहाला याबाबत नेमकी माहिती मिळाली पाहिजे. त्याप्रमाणेच नवनियुक्त सदस्यांना देण्यात आलेले बँज निकृष्ट दर्जाचे असल्याने ते बदलून देण्याची गरज असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मात्र त्यानंतर उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचे सदनात आगमन झाल्याने त्यांनी आपला मुद्दा मागे घेतला. अध्यक्षांनी देखील उपमुख्यमंत्री सभागृहात हजर असल्याकडे लक्ष वेधले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजीत पवार यानी सन २०२१- २२ या वर्षांचा विमानतळ विकास कंपनी मर्यादीत या शासकीय उपक्रमाचा वार्षिक अहवाल सादर केला.

त्यानंतर अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्ष पदी ज्येष्ठ सदस्य चैनसुख संचेती यांची नियुक्ती करत असल्याची घोषणा केली.
स्थगन प्रस्तावाच्या सूचना अध्यक्षांनी दालनात नाकारण्यात आल्याची घोषणा केली. दुपारी राज्यपालाच्या अभिभाषण चर्चेनंतर नियम १०१ अन्वये परभणी येथील घटनेबाबत चर्चा घेण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर अध्यक्षांनी औचित्याचे मुद्द्यांचे कामकाज पुकारले. सभागृहात या अधिवेशनात प्रश्नोत्तरे नसल्याने औचित्याचे मुद्दे मांडायची संधी देण्यात येत असल्याचे अध्यक्ष म्हणाले. त्यानुसार चंद्रदिप नरके, अबु आझमी, अजय चौधरी, अशोक पाटील, भास्कर जाधव, राजकुमार बडोले इत्यादी अनेक सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघातील तातडीच्या आणि सार्वजनिक महत्वाच्या प्रश्नावर सरकारकडून कार्यवाही करण्यात यावी यासाठी विषय उपस्थित केले.
राज्यपालांच्या अभिभाषनावरील चर्चा सुरू असतानाच शिवसेना उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray)पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी नियम ४७ अन्वये व्यक्तिगत खुलासा करण्याची अनुमती मागताना सभागृहात उपस्थितीबाबत ८७ सदस्यांच्या स्वाक्षरी असताना त्यातील १७ सदस्य सदनात गैरहजर होते याबाबत आपणाला सभागृहाचा अवमान करण्याचा हेतू नाही मात्र वस्तुस्थिती समोर आणायचा प्रयत्न केला आहे असे त्यांनी सांगितले. त्यावर तालिका अध्यक्ष चैनसुख संचेती यांनी अभिभाषणावरील चर्चा पुढे सुरू केली. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे वरूण सरदेसाई यांनी भाग घेतला.

ही चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis)यांना अध्यक्ष राहूल नार्वेकर(Rahul Narvekar) यांनी तीन नविन विधेयके मांडण्याची अनुमती दिल्याने मुख्यमंत्र्यानी महाराष्ट्र मुल्यवर्धित कर सुधारणा विधेयक मांडले या विधेयकात पेट्रोकेमिकल उत्पादने, मोटार स्पिरीटच्या विक्री केंद्राना किरकोळविक्री केंद्र म्हणून सूट देण्याची तरतूद असल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले. त्यानंतर हे विधेयक मांडण्याची घोषणा अध्यक्षांनी केली. या विधेयकानंतर मुख्यमंत्र्यानी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ मांडण्याचे कामकाज करताना या विधेयकाचा उद्देश सांगितला. ते म्हणाले की, शहरी भागातही नक्षल संघटनांचे लोण पसरत आहे. अश्या नक्षल कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्याकडे सक्षम कायदा नाही.त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना त्याबाबत सक्षम कायदे करण्याचे सल्ला आणि मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार तेलंगणा, आंध्र, छत्तीसगड, ओडिशा या राज्यात असा कायदा करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात देखील अस कायदा आता मंजूर करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.   त्यानंतर हे विधेयक मांडण्यास सभागृहाची अनुमती असल्याची घोषणा करत अध्यक्षांनी सदर विधेयक मांडल्याचे घोषित केले. या विधेयकांनतर मुख्यमंत्र्यानी महाराष्ट्र कारागृहे व सुधार सेवा विधेयक मांडले. या विधेयकात कैद्याना एका राज्यातून अन्य राज्यात हलविताना त्यांचे पुनर्वसन आणि सुधारणा संदर्भात हे विधेयक आहे असे ते म्हणाले हे विधेयक देखील त्यानंतर मांडण्यात आले.

त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा पुढे सुरू ठेवण्यात आली. त्यात रोहित पाटील, नितीन राऊत, स्नेहा दुबे, विजय वडेट्टीवार, सत्यजीत देशमुख इत्यादी अनेक सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ही चर्चा सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत काही विधाने केल्याचा मुद्दा नितीन राऊत यांनी माहितीच्या मुद्याव्दारे मांडायचा प्रयत्न केला. मात्र वरिष्ठ सभागृहातील विषयांवर या सदनात चर्चा उपस्थित करण्याचा प्रघात नसल्याचे सांगत मंत्री आशिष  शेलार यांनी सदस्यांच्या या मुद्यावर आक्षेप घेतला. अध्यक्षांनी त्या नंतर हा विषय मांडण्यास अनुमती नाकारली.

त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा सुरूच राहिली, त्यात कराडचे अतुल भोसले, ज्योती गायकवाड, प्रविण स्वामी, बापू पठारे सुलभा खोडके, गोपीचंद पडळकर आदी सदस्यांनी सहभाग घेतला.   त्यानंतर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीचा अहवाल संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदनात सादर केल्या. त्या आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आल्या. यावेळी नाना पटोले यांनी मंत्रिमंडळ खातेवाटप  न झाल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर पटोले यांच्याशी चर्चा करुन नंतर सांगू असे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले.  त्यानंतर अभिभाषण चर्चेवर उद्या उत्तर देण्याची घोषणा तालिका अध्यक्ष चैनसुख संचेती यांनी केली. त्या नंतर विधेयकाचे कामकाज घेण्यात आले. हे समालोचन लिहून पूर्ण होत असताना  सभागृहात विधेयकांचे कामकाज सुरु होते.

किशोर आपटे

(लेखक व राजकीय विश्लेषक)

विधानसभा समालोचन दि. १७ डिसेंबर २४

Social Media

One thought on “विधानसभा समालोचन दि. १८ डिसें. २४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *