उण्यापुऱ्या वर्षभरापूर्वीची गोष्ट !
मी माझ्याच कवितांच्या राज्यात मनसोक्त आनंद घेत असतांना, नुकतीच फोन वर ओळख झालेल्या, वैशालीताई मुलमुले, ह्यांनी सहज बोलता बोलता “माय मराठी नक्षत्र परिवार” मधे सामिल होण्याचा सल्ला दिला आणि तेवढ्याच सहजपणे मी ही सामिल झालो !
“माय मराठी नक्षत्र परिवार ” च्या अध्यक्षा, विजयाताई मारोतकर ! सुप्रसिद्ध साहित्यिका, मराठी कथा, कवितासंग्रह, कादंबर्या, चरित्र कथा, हिंदी साहित्य, अशी एकूण त्यांची ३५ पुस्तकं त्यावेळेपर्यंत प्रकाशित झालेली होती. शिवाय अनेक नावाजलेले पुरस्कारही त्यांच्या नावावर जमा होते ! आणि “पोरी जरा जपून” ह्या त्यांच्या जाणत्या वयातल्या मुलींसाठी च्या प्रबोधनपर कार्यक्रमामुळे, त्या महाराष्ट्र भर गाजलेल्या आहेत हेही ऐकून कळले होते. अशा व्यक्तिमत्त्वाच्या समुहात आपण सामावल्या गेलो आहोत ह्याचा आनंदही होताच !
अशा अष्टपैलू साहित्यिकेशी बोलून बघावं, म्हणून सुरूवातीच्या दिवसात एकदा मी विजयाताईंना फोन केला. फोन उचलल्या जाईल की नाही, उचलला तर ही एवढी मोठी व्यक्ती आपल्याशी बोलेल की नाही, शिष्ट वगैरे असतील का, ह्या शंका मनात होत्याच !
आश्चर्य म्हणजे, पहिल्याच ‘फोनवरच्या’ भेटीत जवळजवळ अर्धा तास त्या अगदी घरच्या व्यक्तीशी बोलावं तशा आपुलकीने बोलत होत्या ! माझी भिती सपशेल खोटी ठरली !!!
“अरे तुम्ही तर अगदी घरचेचं आहात “,
मी संपूर्ण गार !!!!
“माया, माझी बहीण तुमच्याच अपार्टमेंट्स मधे तुमच्याच शेजारी रहाते, तिच बोलली मला हे !”
ह्या अशा इतक्या साध्यासुध्या स्वभावाच्या विजयाताई, अगदी माझ्या हृदयाच्या आतल्या कप्पात, कधी घर करून बसल्या कळलं ही नाही !
दरम्यान नुसत्या माझ्या कवितांचं सौंदर्य बघून समुहातील कवींच्या ऑनलाईन काव्यस्पर्धेसाठी नेमलेल्या दोनपैकी एका परिक्षकपदाचा सन्मान मला दिल्या गेला, त्यावरून विजयाताईंच्या गुणग्राहकतेची आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या स्शभावाची पहिली प्रचिती आली !
माय मराठी नक्षत्र परिवाराच्या पदग्रहण समारंभात पहिल्यादा विजयाताईंशी प्रत्यक्ष भेट झाली ! कार्यक्रम सुरु झाल्यावर पाच एक मिनीटांनी मी सभागृहात शिरलो. मंचकावर बसल्या असतांनाही तिथून विजयाताई ताईंनी, माझ्या सारख्या नवख्याला, उद्देशून म्हटलेलं “या गजापूरे सर !” हे अगत्यशील वाक्य मनाला सुखावून गेलं आणि सतत मनात आपलेपणाची जाणीव देत राहीलं…
अशा भेटी गाठी वाढू लागल्या आणि एकदा बोलता बोलता सहज त्यांनी विचारलं, “तुम्ही तुमचा काव्यसंग्रह का नाही काढत ?”
झालं ! काही हितचिंतकानी आधीच माझ्या मनात भरलेल्या ह्या विचाराला आणखी बळ मिळालं !
माझ्या नुसत्या फोन वरील विनंतीवर, विजयाताईंनी माझ्या काव्यसंग्रहासाठी प्रस्तावना लिहीण्याचं मान्य केलं. तेही त्या काळात अतिशय व्यस्त असतांना ! “तेरा तारखेला मी तुम्हाला प्रस्तावना पाठबू शकेन” असं जवळ जवळ दहा दिवसांआधी सहजपणाने त्यांनी सांगितलेलं वाक्य मी अगदी मोघमपणे स्विकारलं. पण तेरा तारखेच्या सायंकाळी माझ्या मोबाईल वर आलेली त्यांची परिपूर्ण आणि अतिशय सुंदर प्रस्तावना, त्यांची “शब्द” जाणीवपुर्वक पाळण्याची आणि दिलेल्या शब्दाचा मान ठेवण्याची सवय अधोरेखित करून गेली !
काव्यसंग्रहाचं प्रकाशन म्हणजे अक्षरशः “वधूपित्याची” धावपळ ! झालं झालं म्हणता, कुठे घोडं अडेल ते सांगताच येत नाही ! त्यातल्या त्यात मी असा “पहिलटकर” ! आणि दुसर्या बाजूस विजयाताईंची ३५ पुस्तकं प्रकाशित झालेली ! त्यामुळे हक्काचा माणूस म्हणून त्यांचा आधार खूप धीर देवून गेला !
ऐन वेळेवर मुखपृठ करणाऱ्या चित्रकारा कडून आलेल्या अपरिहार्य नकाराने भांबावून मी जरा अपरात्रीच विजयाताईंना फोन केला आणि “मी करते काहीतरी व्यवस्था”, असं म्हणून ताईंनी अवघ्या दहा मिनीटात दुसऱ्या चित्रकाराशी बोलून ताबडतोब मला स्वतःच फोन करून सांगीतले, “संपला बघा तुमचा प्रश्न !”, उद्या सकाळी “xxx ला भेटा आणि मुखपृठ घेऊन जा.” खरंच प्रश्न सुटला होता ! दुसर्या दिवशी सायंकाळी माझ्या प्रस्तावित काव्य संग्रहाचं मला हवं तस्सच नितांत सुंदर मुखपृठ माझ्या हाती होतं !!!!
माझं पहिलंवहिलं काव्यसंग्रह “भाव अंतरीचे” !
पहिल्या प्रतीचं पहिलं मुखावलोकन !
एक आटोपशीर घरगुती कार्यक्रम!
माझ्या विनंतीचा मान ठेवून विजयाताई आल्या, माझं आणि माझ्या कवितांच भरभरून कौतुक केलं ! “हा माणूस आम्हाला आजवर सापडला कसा नाही ?” हा त्यांचा कौतुक मिश्रित शेरा माझ्यासाठी जीवाला भारून टाकणारा होता. माझंच नाही तर तिथे उपस्थित असलेली माझी आई, माझी अर्धांगिनी, सतत कामात धावपळ करणारी माझी मुलं ह्या सर्वांचं अगदी आपुलकीने मनभरून कौतुक केलं. माझ्या कुटुंबीयांच्या मनातला एक कोपरा विजयाताईंनी काबिज केला !
आज प्रकाशनानंतरच्या उण्यापुऱ्या पाच महिन्यात माझ्या काव्यसंग्रहाच्या सर्व प्रती संपायला आल्यात, आणि दुसर्या आवृत्तीचे वेध लागायला आलेत ! हा त्यांचाच आशिर्वाद !
पहिल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन आणि त्यासाठी माय मराठी नक्षत्र परिवाराच्या सुरात सूर मिसळून धनवटे नॅशनल काॅलेज ने तेवढ्याच आपलेपणाने दिलेली साद हा विजयाताईंच्या, जगतमैत्रीचा, लहान मोठ्या सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या, सर्वसमावेक्षक स्वभावाचा दृष्य परिणाम !
ह्या आयोजनासाठी वेळोवेळी होणाऱ्या मिटींग्ज मधून ताईंचं प्रत्येक बारीक सारीक तपशिलासह केलेलं मार्गदर्शन, साधक बाधक चर्चा, योग्य त्या व्यक्तीवर सोपवलेली योग्य ती जबाबदारी त्यांच्या सहकार्यांवरचा ठाम विश्वास दाखवतो. जबाबदारीचं भान ठेऊन तेवढ्याच उत्साहाने आम्हाला ती पार पाडण्यातला आनंद आम्हास मिळाला तो त्यांच्याकडून झालेल्या आम्हा सर्वांच्या उस्फूर्त कौतुकामुळे !
अगदी ग्रंथ दिंडी पासून तर समारोपाच्या सत्रापर्यंत दोन दिवसातील प्रत्येक पर्व अत्यंत देखणा आणि उत्साहाने परिपूर्ण! संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख पाहूणे, निमंत्रित साहित्यिक ह्या प्रत्येकाच्या तोंडून त्यांच्या भाषणाच्या वेळी विजयाताईंबद्दल अत्यंत आदराने निघणारे उद्गार, आमच्यात, अगदी आमच्यातल्याच म्हणून सहजपणाने वावरणाऱ्या विजयाताई, प्रत्यक्षात कित्ती मोठ्या आहेत ह्याची, पुन्हा पुन्हा जाणीव होत होती, आणि दरवेळी अभिमानाने उर भरुन येत होता !
साहित्य संमेलन सोहळा सुरू असतांनाच विजयाताईंना मिळालेलं, गोवा राज्याच्या पहिल्या अखिल भारतीय, बहुभाषिक साहित्य संमेलनासाठीच्या अध्यक्षपदासाठीचं आमंत्रण, ही आम्हा संपूर्ण नक्षत्र परिवारासाठी अकल्पीत, आनंदविभोर करणारी बातमी होती !
आजवरच्या माझ्या अल्प सानिध्यात मला एवढं नक्की कळलं की विजयाताईंचं कामच पहिले पुढे जात असते आणि मग त्याचा मागोवा घेत पुरस्कार त्यांच्या मागे धावत असतात ! त्याचं काम त्यांना पुरस्कृत करीत असलं तरी त्यामुळे शोभा वाढते ती त्या पुरस्कारांची !
“जीवन गौरव साहित्य परिवार महाराष्ट्र राज्य” चा राज्य उपाध्यक्ष ह्या नात्याने, एकदा मी विजयाताईंना त्या समुहातील नवलेखकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम “कथेवर बोलू काही” देण्यास विनंती केली. कुठलेही आढेवेढे न घेता त्यांनी विनंती मान्य केली. दिड तासाच्या त्यांच्या मार्गदर्शन पर कार्यक्रमात त्यांनी कथेच्या उगमापासून ते समापनापर्यंत प्रत्येक गोष्टीवर अधिकार वाणीने भाष्य केलं. आज त्या समुहात अनेक प्रतिथयश कथाकार तयार होऊ लागले आहेत ! हा त्यांच्या मार्गदर्शनाचा परिणाम !
नुकताच मी जळगावहून अखिल भारतीय सूर्योदय साहित्य संमेलनाहून परतलो. संमेलनात मी नागपूर चा, हे समजताच समोरच्या साहित्यिकाच्या तोंडून विजयाताईंचं निघायचं आणि नागपूर च्या साहित्य संमेलनाची तारीफ ऐकून मन कृतार्थ व्हायचं !
तारुण्यात पदार्पण करतावेळी, वाटेवर अजाणतेपणी लागलेलं वेगळं वळण, त्यांच्या एका विद्यार्थिनीच्या अकल्पित अकाली मृत्यूवर थांबलं, ही गोष्ट विजयाताई च्या एवढ्या जिव्हारी लागली, की त्यानंतरच्या कित्येक दिवस आणि रात्री त्यांनी अस्वस्थ पणे तळमळण्यात घालविल्या. ह्या मुलींना घसरण्या आधी सावरलंच पाहिजे ह्या विचाराने झपाटलेल्या विजयाताई कडून जन्माला आला तो “पोरी जरा जपून ” हा त्यांचा तारूण्याच्या उंबरठ्यावरच्या मुलींसाठीचा मार्गदर्शनपर कार्यक्रम! आजवर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे ३०२ प्रयोग झालेत ! प्रत्येक कार्यक्रमात मुलींची तुडूंब गर्दी आणि त्यांचा प्रचंड प्रतिसाद!
आजवर लाखो मुलींना त्यांचं मार्गदर्शन लाभलं आहे. ह्या सर्व विजयाताईंच्या भाषेत, त्यांच्या “लेकी” आहेत ! अशी प्रेमळ, मार्गदर्शक, घसरण्या आधी सावरून घेणारी माय महाराष्ट्राच्या लेकींना मिळणं हे एक भाग्यच ! मुलींच्या आयुष्यात घडलेल्या सत्य प्रसंगावर लिहीलेली (अर्थातच नावं बदलून) ” पोरी जरा जपून ” ची द्वितीय आवृत्ती विजयाताईंनी मला वाचायला दिली. ती वाचतांना कित्येकदा डोळे भरून आले. आपण कल्पनाही करू शकणार नाही, असे थरकाप उडवणारे प्रसंग मुलींच्या आयुष्यात घडलेले आहेत. पुस्तकात शेवटी मुलींकडून ताईंना मिळालेले अनेक अभिप्राय ताईनी त्यात उद्धृत केलेले आहेत. मुलांचेही आहेत, हृदयाला पाझर फोडणारे आहेत. हे पुस्तक मुलामुलींनी नव्हे तर त्यांच्या पालकांनीही आवर्जून वाचायला हवेत. आणि विकृत मानसिकतेचे शिकार झालेले नराधम हे पुस्तक वाचून स्वतःच्या कृत्यांच्या शरमेने मरतील इतकं परिणाम कारक पुस्तक आहे हे !
साहित्य वर्तुळात माझी काही फारशी उठबस नाही, पण कधी कुणाशी बोलण्याच्या ओघात विजयाताईंचा विषय निघाला तर समोरच्याच्या तोंडून अरे, विजयाताई चा “पोरी जरा जपून” हा कार्यक्रम मी बघितला आहे, अशी प्रतिक्रिया मी खूपदा ऐकली आहे ! विजयाताई स्वतः बाबतीत सहसा कधी बोलत नाहीत. पण “पोरी जरा जपून ” चा तिनशे एक वा प्रयोग करून आल्यावर बोलण्याच्या ओघात सहज बोलून गेल्या की त्या तिन तासांच्या कार्यक्रमात उभं राहून त्यांचे पाय प्रचंड सुजले होते. आणि त्या वेदनांची त्यांना कार्यक्रमाच्या आवेगात जाणीवही होत नाही, इतक्या त्या समरस झालेल्या असतात. मोठेपण सहज मिळत नसते. त्याची त्यांनी किंमत मोजली आहे ! हे त्यांचं झपाटलेपण ! त्या मागची भावना… लेकींचं भलं व्हावं बस्स ! माझा पूर्ण विश्वास आहे त्यांचा हा प्रवास कार्यक्रमाचे आकडे वाढविण्यासाठी नाही. ते त्यांचे वेड आहे, मुलीचं भविष्य वाचवायचं ! मला खात्री आहे, ताईंची ही तळमळ त्यांना कधीच स्वस्थ बसू देणार नाही ! ३०० च काय ५००० प्रयोग होतील तेव्हाही !
लाखो लेकींचं भविष्य विजयाताईंमुळे सुरक्षित आणि उज्वल झालेलं आहे. लेकींनी त्यांना आपलेपणाने “माय” चा दर्जा दिलेला आहे. ताईंना किती तरी पुरस्कार मिळालेत आणि भविष्यातही मिळत रहातील. पण त्यांच्या असंख्य लेकींनी त्यांना आत्मियतेने बहाल केलेला “माय” हा पुरस्कार नेहमीच मोठा ठरेल !
विजयाताई तुमची वाटचाल थांबण्यासाठी नाही ! तुम्ही थांबून चालणारही नाही. कित्येक लेकी तुमची अजूनही वाट बघत आहेत…..
असं म्हणतात, की वटवृक्षाचा स्वतःचाच पसारा एवढा मोठा असतो की त्याच्या खाली सहसा कुठलंही झाड वाढत नाही!
विजयाताई ह्या व्याखेत बसत नाहीत ! त्या वटवृक्ष नाहीतच ! त्या कल्पवृक्ष आहेत ! त्यांना छायाछत्रात उभं असणाऱे सारेच गूणी आणि स्वयंभू आहेत. त्यांना काही मागावं लागत नाही. उलट त्याच प्रत्येकाचे गूण हेरून त्याला पुढे नेण्यासाठी हात ओढत असतात. सदैव प्रेरित करीत असतात. विजयाताईंचं सामान्यपणच त्यांना असामान्यत्व बहाल करतं !
मला माझ्या आजवरच्या प्रवासात गवसलेल्या विजयाताई ह्या अशा आहेत…
काहींना माझा हा लेख, साखर पेरणी किंवा व्यक्तिपूजा वाटू शकतो ! पण व्यक्तिपूजा त्याची केली जाते, ज्याच्या कडून काही स्वार्थ साधावयाचा आहे ! माझ्या कवितांनी मला ध्यानी मनी नसतांना, आजवर जे सन्मान मिळवून दिलेत त्यात मी तृप्त आहे, तेच माझ्यासाठी कल्पनातीत समाधान देणारं आहे ! त्यामुळे मला कुठलाही स्वार्थ साधन्याची गरज नाही आणि तशी सवयही नाही, हे मला प्रत्यक्ष ओळखणारे जाणतात.
माझ्या मनात विजयाताईंबद्दल, वेळोवेळी जे शब्द भरभरून दाटून येत होते, साचत होते, त्याचा आज निचरा झाल्याचं समाधान मिळालं, हेच ह्या लेखणाच्या अंती सांगावसं वाटतं !
अनेक वळणं घेत, असंख्य सांधे बदलत, माझ्या आयुष्याची प्रसन्न वाटचाल मनासारखी शांत संथ गतीने सुरू असतांना, विजयाताई तुम्ही माझ्या आयुष्यात आलात हे माझ्या पूर्वसंचिताचं फळच समजतो मी !
विधी लिखीत काय ते त्या परमेश्वरास ठाऊक……
विकास गजापुरे
नागपूर M-9209812148
(ह्या लेखाचे लेखक विख्यात कवी असून, नुकताच त्यांचा “भाव अंतरीचे” हा वृत्तबद्ध कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे)
World Press Freedom Day 2022 : सोशल मीडियाचा वाढता प्रभाव आणि प्रसार
अनाथांची माय पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे स्वप्न पूर्ण होणार
Akshayya Tritiya 2022: अक्षय्य तृतीया आणि परशुराम जयंती ; जाणून घ्या माहिती…