राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दि ३ मार्च पासून सुरू झाले. या वर्षीच्या सत्राची सुरुवात प्रथा आणि परंपरेनुसार राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने झाली. त्यानंतर दिवंगत पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह अन्य दिवंगत सदस्यांना पहिल्याच दिवशी शोकप्रस्तावाव्दारे श्रध्दांजली देण्यात आली. त्यानंतरच्या पहिल्या सप्ताहात अनेक वादळी घडामोडी झाल्या. त्यात सन२०२४-२५च्या सहा हजार कोटीपेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक वर्षांतील तिस-यांदा सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्याव्दारे मंजूर करण्यात आल्या. सन २०२४-२५ या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल, अन्न व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, विधिमंडळ आवारात मुघल बादशहा औरंगजेब याचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य, त्यावरून मंगळवारी सभागृहात झालेला गदारोळ. त्यात दिवसभरासाठी कामकाज तहकुबी, त्यानंतर समाजवादी पक्षाचे सदस्य अबु असीम आझमी यांचे सदस्यत्व या सत्राच्या शेवटच्या दिवसपर्यत निलंबीत करण्याचा मंजूर करण्यात आलेला ठराव, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी लयभारी यूट्यूब वाहिनी तसेच दै सामना चे कार्यकारी संपादक खा संजय राऊत आणि विधानसभेतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सदस्य रोहित पवार यांच्या विरोधात मांडलेली हक्कभंगांची सूचना, महिला दिना निमित्त सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात अध्यक्षांचा विशेष प्रस्ताव आणि त्यावरील चर्चेला महिला आणि बालविकास मंत्री यांचे उत्तर, राज्यपालांच्या अभिभाषणाला विधानसभेत मुख्यमंत्र्याकडून देण्यात आलेले उत्तर असे भरगच्च कामकाजाचा हा पहिला सप्ताह गाजला असे म्हणावे लागेल.
दि. ३ मार्च रोजी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सप्ताहातील पहिल्याच दिवशी प्रथेनुसार राज्यपालांचे संयुक्त सभागृहात झालेले अभिभाषण , त्यानंतर विधानसभा सभागृहात त्याबाबत चा आभार प्रस्ताव सन २०२५-२६ या वर्षाच्या अर्थसंकल्पातील पुरवणी मागण्या, तालिका अध्यक्षांच्या यादीची घोषणा, शोकप्रस्ताव असे कामकाज पार पडले.
सकाळी अकरा वाजता दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी संबोधित केले. त्यानंतर वीस मिनीटांनी विधानसभा नियमीत कामकाज वंदे मातरम आणि व राज्यगीताने सुरु झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करुन देण्यात आला. अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत पटलावर ठेवण्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला.
सुमारे चाळीस मिनिटांच्या अभिभाषणाची सुरुवात मराठीतून करत राज्यपालांनी सांगितले की, माझे शासन, राज्यातील जनते ची सेवा करताना, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा, महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि इतर अनेक महान नेते व समाजसुधारक यांच्या उच्च आदर्शांचे सदैव पालन करील.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्याच दिवशी सरकारकडून एकूण रु.6,486.20 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. या पुरवणी मागण्यांमध्ये ग्रामीण भागात घरे, कृषीपंपांना वीजदर सवलत, रस्तेविकासाला गती पायाभूत सुविधा आणि लोकोपयोगी योजनांसाठीच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत.
त्यात ग्रामीण नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे, मुख्यमंत्री बळीराजा वीजदरसवलत योजनेंतर्गत कृषिपंप ग्राहकांना वीजदर सवलत, केंद्र योजनेअंतर्गत रस्ते व पूल प्रकल्पांसाठी बिनव्याजी कर्जासाठी निधी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना, पुणे रिंग रोड, जालना नांदेड द्रुतगती महामार्गाच्या कामांना गती, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास बळीराजा जलसंजीवनी योजना, शासन अंशदान घटकाखाली विविध प्रकल्पांना निधी अशा लोकोपयोगी आणि राज्याच्या पायाभूत विकासाला बळकटी देण्यासाठी निधीची तरतूद असलेल्या 6 हजार 486 कोटी 20 लाख रुपयांच्या आणि निव्वळ भार 4 हजार 245 कोटी 94 लाख रुपये इत्यादी पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी वर्ष 2024-25 च्या पुरवणी मागण्यांमध्ये . सादर केलेल्या 6 हजार 486 कोटी 20 लाख रुपयांपैकी 932.54 कोटींच्या मागण्या अनिवार्य, 3,420.41 कोटींच्या मागण्या कार्यक्रमांतर्गत आणि 2,133.25 कोटी रुपयांच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने सादर करण्या आल्या आहेत. 6,486.20 कोटींच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा. 4,245.94 कोटी रुपये आहे.
त्यानंतर योगेश सागर, बबनराव लोणीकर, संजय केळकर, रमेश बोरनारे, दिलीप बनकर, अमित झनक, सुनील राऊत आणि बापू पठारे यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं.
कामकाज पत्रिकेच्या अखेर दिवंगत पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग, दिवंगत सदस्य हेमसिंग जाधव नाईक मुकुंदराव मानकर, उपेंद्र शेंडे, आणि तुकाराम बिरकड या सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर सदस्यांनी दिवंगत सदस्यांना स्तब्ध उभे राहात आदरांजली वाहिली. कामकाज पत्रिकेवरील विषय पूर्ण झाल्याने दिवसभराकरता कामकाज स्थगित करण्यात आले.
दि ४ मार्च अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या दिवशी विधानसभेच्या कामकाजपत्रिकेवरील कोणतेही कामकाज होवू शकले नाही. समाजवादी पक्षांचे सदस्य अबु असिम आझमी यानी सोमवारी विधिमंडळ परिसरात माध्यमांसमोर बोलताना केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवरून संतप्त झालेल्या सत्ताधारी भाजप शिवसेना सदस्यांनी सभागृहात अबु आझमी यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची आग्रही मागणी केल्याने सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे सभागृह तीनवेळा तहकूब करावे लागले. तर त्यानंतरही कामकाज करणे अशक्य असल्याने दुपारी १२.१४ वाजता अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.
सकाळी अकरा वाजता विधानसभेचे कामकाज सुरू होताच संतप्त भाजप सदस्य महेश लांडगे यांनी अबु आझमी यांच्या वक्तव्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या शिवप्रेमी नागरीकांमध्ये संतापाची भावना असल्याचे सांगितले. ते म्हणाले की अबु आझमी यांनी जाणिवपूर्वक हिंदू शिवप्रेमी नागरीकांच्या भावना भडकविण्यासाठी हे वक्तव्य केले असून त्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यानंतर भाजप सदस्य अतुल भातखळकर यानी देखील अबु आझमी नेहमीच अश्या प्रकारच्या हिंदूच्या भावना भडकविणारी वक्तव्ये करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, छत्रपती संभाजी राजे यांच्यावर अनन्वित अत्याचार करणारा, स्वत:च्या बापाला आणि भावाना निर्दयीपणे ठार करणारा, हिंदूवर जिझीया सारखा कर लादणारा, तुळजापूरच्या भवानी मंदीराचा विध्वंस करण्याचा प्रयत्न करणा-या औरंगजेबाचे उदात्तीकरण करणा-या अबु आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा अशी मागणी त्यानी केली. त्यानंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील भाजप सदस्यांच्या वक्तव्यांचे समर्थन केले. ते म्हणाले की, सभागृहात अबु आझमी यांच्याकडून नेहमीच अश्या प्रकारे सामाजिक सौहार्द बिघडवणारी वक्तव्ये केली जातात. यावेळी देखील आझमी यांनी जे वक्तव्य केले आहे त्यामुळे त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल केला पाहीजे अशी मागणी त्यानी केली.
त्यानंतर अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी विरोधी बाकावरील शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना बोलण्याची संधी दिली. भास्कर जाधव यांनी आपण नियम ९७ अन्वये सभागृहात प्रश्नोत्तरे रहित करून आझमी यांच्या वक्तव्यावरील मुद्यावर लक्ष वेधल्याचे सांगितले. त्यावेळी सभागृहात सत्ताधारी बाजुचे सदस्य वेलकडे धावले. आणि गदारोळ सुरू झाला. यावेळी सत्ताधारी बाजूच्या सदस्यांकडून ‘जय भवानी जय शिवाजी’ च्या घोषणा दिल्या जात होत्या तर अनेक सदस्यांनी आपली आसने सोडून पुढे जात अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत निदर्शने सुरू केली होती. या सदस्यांना जागेवर जाण्यासाठी वांरवार सूचना देण्यात आल्या मात्र यावेळी दोन्ही बाजूच्या सदस्यांकडून जोरदार नारेबाजी सुरू असल्याने प्रथम अकरा वाजून आठ मिनीटानी कामकाज दहा मिनीटांसाठी तहकूब केल्याची घोषणा अध्यक्ष राहूल नार्वेकर यानी केली.
त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाले त्यावेळी गोंधळातच विरोधीपक्षांच्या बाजूने शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी अबु आझमी यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. त्यावेळी सत्ताधारी सदस्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती तर विरोधी बाजूच्या सदस्यांनी देखील त्याचवेळी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर सभागृहात कामकाज करणे अशक्य असल्याने अध्यक्ष नार्वेकर यांनी कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले.
पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू झाले त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंधळातच आपली भुमिका मांडली. त्यावेळी दोन्ही बाजूचे सदस्य आपल्या मागणीवर ठाम होते, त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. त्यातच एकनाथ शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की समाजवादी पक्षाचे सदस्य अबु आझमी यांच्या वक्तव्यामुळे सदस्यांच्या नव्हे तर संपूर्ण शिवप्रेमी नागरीकांच्या भावना भडकविण्याचे काम केले जात आहे. धर्मवीर संभाजीराजे याचे कसे हाल त्या औरंगजेब याने केले ते त्या छावा सिनेमातून समोर आले आहे. मात्र आझमी यांच्याकडून त्याच औरंगजेब यांचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने आझमी यांच्यवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ त्यांचे सदस्यत्व निलंबीत केले पाहीजे. शिंदे यांच्या वक्तव्यांच्या वेळी विरोधीबाकावरून शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य जोरदार घोषणा देत होते. त्यानंतर सत्ताधारी सदस्यंकडूनही नारेबाजी सुरू झाली. देवयानी फरांदे आणि अन्य सदस्यांनी नंतर अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत जावून आग्रहीपणे आपली मागणी मांडायचा प्रयत्न केला. त्यावेळी सभागृहात प्रचंड गोंधळाची स्थिती होती. त्यावेळी तालिका अध्यक्ष संजय केळकर यांनी कामकाज १५ मिनीटांसाठी तहकूब केल्याची घोषणा केली.
त्यानंतर पुन्हा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी कामकाज सुरू केले तेंव्हा त्यांनी सद्स्यांना पुढील कामकाज करण्यासाठी आपापल्या जागेवर जाण्याची सूचना केली मात्र सत्ताधारी भाजप शिवसेना सदस्यांकडून नारेबाजी आणि संतप्त घोषणाबाजी सुरू होती त्यावेळी सभागृहात गोंधळाची स्थिती होती. शिवसेना सदस्य मराठी भाषा मंत्री उदय सामंत यानी गोंधळातच अबु आझमी यांच्या वक्तव्यांमुळे सदस्यांच्या भावना दुखावल्या असून आझमी यांना निलंबीत केल्याशिवाय सभागृहाचे कामकाज सुरू होवू शकणार नसल्याचे सांगितले. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिले त्यामुळे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी बारा वाजून १४ मिनीटांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करत असल्याची घोषणा केली.
दि ५ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सप्ताहातील तिस-या दिवशी प्रश्नोत्तरे, लक्षवेधी या नेहमीच्या महत्वाच्या कामकाजासोबतच राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेचा शेवटचा दिवस असल्याने महत्वाची चर्चा पूर्ण झाली. या शिवाय समाजवादी पक्षाचे सदस्य अबु आसीम आझमी यांनी मुघल बादशहा औरंगजेब यांच्याबद्दल उदात्तीकरण करणारी वक्तव्ये विधानसभवनाच्या प्रांगणात माध्यमांसमोर बोलताना केल्याचे पडसाद विधानसभेत पडले होते. त्याबाबत संसदीय (विधान) कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अबु आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सत्र संपण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत निलंबीत करण्याबाबत प्रस्ताव मांडला, या प्रस्तावाच्या वेळी विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये करणा-या अनेक सत्ताधारी नेते कार्यकर्ते यांच्यावर देखील कारवाईची मागणी केल्याने सभागृहात सत्ताधारी सदस्यानी घोषणाबाजी केल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या गदारोळातच निलंबनाबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
सकाळी अकरा वाजता कामकाजाची सुरूवात प्रश्नोत्तरांच्या तासाने झाली. अकोला जिलह्यातील शासकीय वैद्यकीय महारविद्यात एम आर आय-३ टेस्ला मशिन खरेदीबाबतचा साजिद पठाण आणि अन्य सदस्यांचा प्रश्न गाजला. या प्रश्नावर सभागृहात वीस मिनीटापेक्षा जास्त काळ चर्चा झाली. यावेळीअनेक सदस्यांनी आपापल्या मतदारसंघाशी संबंधित उप प्रश्न विचारल्याने संबंधित प्रश्नाची माहिती घेवून उत्तरे देण्याची तयारी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यानी दर्शवली. अकोला येथे संबंधित मशिन नसल्याने रुग्णांची गैरसोय होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील सात जिल्ह्यात भूजलामध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढले असल्याबाबत रोहित पवार आणि अन्य सदस्यांचा महत्वाचा प्रश्न गाजला. यावेळी देखील राज्यातील बहुसंख्य विभागात शुध्द पाण्याचा प्रश्न असल्याने त्यावर स्वतंत्र चर्चा घेण्याची मागणी संजय कुटे यानी केली. तर सुधीर मुनगंटीवार यानी यासाठी आमदारांची समिती नेमण्याची सूचना केली. यावेळी प्रश्नाला उत्तर देताना पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारने याबाबत वेगवेगळे सर्व्हे केल्याचे सांगितले. ते म्हणाले की या प्रश्नाची व्याप्ती मोठी असल्याने त्यावर सदस्यांच्या प्रश्नांना स्वतंत्रपणे उत्तरे देण्याची तयारी त्यानी दर्शवली.
राज्यात एचएमपीव्ही विषाणू रोखण्यासाठी करायच्या उपाय योजना बाबत डॉ नितीन राऊत आणि अन्य सदस्यांच्या प्रश्नावर सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की,नागपूर येथे ज्या दोन रुग्ण सापडल्या होत्या त्यांच्याबाबत सुरूवातीला काळजी करण्यासारखी स्थिती होती मात्र नंतर त्यांची स्थिती सुधारल्याचे अहवालात आढळून आले. या बाबतचा साथीचा रोग नव्हता तर श्वसनाचा गंभीर आजार असल्याने त्यावर प्रतिबंधातम्क उपाय योजना करण्यात आल्या असून आता त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
प्रश्नोत्तरांच्या तासानंतर विधान कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानभवन परिसरात समाजवादीचे सदस्य अबु आझमी यानी सोमवारी केलेल्या वक्तव्यांबाबत मंगळवार दि ४ मार्च रोजी विधानसभेत झालेल्या मागणी नुसार त्यांच्या हे सत्र संपेपर्यंत निलंबनाबाबतचा प्रस्ताव मांडला त्यावर सुधीर मुनगंटीवार यानी अनुमोदन देताना अधिक कठोर शासन देण्याची मागणी केली. त्यावेळी विरोधी पक्षाच्या बाजूने बोलताना विजय वडेट्टीवार यानी छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरून अवमान करणा-या कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावर देखील कठोर कारवाईची मागणी केली. त्यावेळी सत्ताधारी बाजूच्या सदस्यांनी नारेबाजी करत वेलकडे धाव घेतली. तर विरोधीबाजूच्या सदस्यांनी देखील त्याला प्रत्युत्तरा दाखल जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा दिल्या. यावेळी गदारोळातच ठराव मंजूर करण्यात आला.
त्यानंतर लक्षवेधी सूचनांचे कामकाज घेण्यात आले. त्यात मोहन मते यांची कल्याण डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाबाबतची लक्षवेधी होती. त्यावर उत्तर देताना प्रभारी नगरविकास मंत्री उदय सामंत यानी मयत महिलेच्या मृत्यूबाबत चौकशी समितीचा अहवाल येताच कारवाई करण्याचे आश्वासन दिले. जयंत पाटील यांच्या पुणे नाशिक महामार्गावर १७ जानेवारी रोजी झालेल्या अपघाताच्या घटनेवरील प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्यमंत्री पंकज भोयर यानी याबाबत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कारवाइ करत असल्याचे सांगितले.पूर्व विदर्भात वन्य प्राण्याच्या धोक्यामुळे स्थानिक शेतकरी संकटात असल्याबाबतच्या विजय वडेट्टीवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना वन मंत्री गणेश नाईक यानी त्याबाबत पूर्वीच सूचना दिल्या असून त्यानुसार कार्यवाही केली जात असल्याचे सांगितले. राज्यात भेसळयुक्त औषधांचा पुरवठा होत असल्याबाबत सुनिल प्रभू आणि अन्य सदस्यांचा प्रश्न होता.
लक्षवेधी सुचनांच्या कामकाजानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावर आभाराच्या प्रस्तावावरील चर्चेला अर्जून खोतकर यांनी सुरुवात केली. ते म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणाची सुरूवात अभिजात मराठी भाषेतून केल्याने अनेक वर्षापासून मराठी जनतेच्या मनात असलेल्या या भाषेच्या विकासाच्या मुद्यावर महायुती सरकारच्या काळात महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. चेतन तुपे यांनी महायुती सरकारच्या कार्यकाळातील महत्वाच्या उपलब्धी बाबत ६१ मुद्यांचा परामर्श राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात घेतल्याचे सांगितले. राम कदम यानी औरंगजेब यांच्या उदात्तीकरणाचे वक्तव्य करणा-या अबु आझमी यांना विरोधी पक्षांच्या नेत्यानी पाठिशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्यावेळी विरोधी बाकावरील सदस्यांनी संतप्त प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सभागृहात गदारोळ झाला आणि स्थिती तणावपूर्ण झाली. मात्र पिठासीन तालिका अध्यक्ष बबनराव लोणीकर यांनी त्यांना अभिभाषणाच्या मुद्यां व्यतिरिक्त भाष्य टाळण्याची सूचना केली. त्यानंतर घोषणाबाजी करणा-या विरोधी सदस्यांनाही त्यानी आसनाकडे जाण्याची सूचना केली. छगन भुजबळ यांनी बीड हत्याप्रकरण तसेच परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी आणि जालना येथे झालेल्या मारहाण प्रकरणाचा उल्लेख करत महाराष्ट्रात जातीय सलोखा नष्ट होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भुजबळ यांच्या मताशी सहमत असल्याचे सांगत सरकारने अश्या प्रकरणात गंभीर दखल घेतली असून दोषी व्यक्तींना कायद्याचा धाक बसेल अशी कारवाई करत असल्याची ग्वाही दिली.
दि ६ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सप्ताहातील चौथ्या दिवशी विधानसभेत कामकाज पत्रिकेत प्रश्नोत्तरे लक्षवेधी इत्यादी महत्वाचे कामकाज होते. या शिवाय सन २०२४-२५ या वर्षाच्या सुमारे सहा हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्यांवरील सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक आरोग्य आणि महिला व बालविकास या महत्वाच्या विभागांच्या मागण्यांवर च्रर्चा आणि मतदानाचा पहिला दिवस होता. या शिवाय विधानसभेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी लयभारी यूट्यूब वाहिनी तसेच दै सामना चे कार्यकारी संपादक खा संजय राऊत आणि विधानसभेतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सदस्य रोहित पवार यांच्या विरोधात हक्कभंगांची सूचना मांडली.
सकाळी अकरा वाजता प्रश्नोत्तरांच्या तासाने कामकाजाची सुरूवात झाली. रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे अनेक वर्षापासून पुनर्वसन झाले नसल्याबाबत रविशेठ पाटील आणि अन्य सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मकरंद जाधव पाटील यांनीपुनर्वसन करण्याबाबत अंतिम कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. त्याशिवाय बाळगंगा प्रकल्पातील आंदोलकांवरील गंभीर गुन्ह्याव्यतिरिक्त अन्य गुन्हे मागे घेण्याबाबत कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्याबाबत बाबासाहेब देशमुख यांचा तारांकीत प्रश्न होता. त्यावर उत्तर देताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यानी या योजनेचा लाभ नगरपंचायत तसेच महापालिका क्षेत्रातील शेतक-यांना देण्यात येत नसल्याचे सांगितले. मात्र ग्रामपंचायत क्षेत्रात योजनेचा लाभ दिला जातो. त्या अंतर्गत आतापर्यंत ३२ ८३२ शेतक-यांना ४२४.८२ कोटी रूपयाचे अनुदान देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रश्नोत्तराच्या तासानंतर लयभारी यूट्यूब वाहिनी तसेच दै सामना चे कार्यकारी संपादक खा संजय राऊत आणि विधानसभेतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सदस्य रोहित पवार यांच्या विरोधात हक्कभंगांची सूचना मांडली. ते म्हणाले की. ज्या प्रकरणात माझी दोन वर्षापूर्वी निर्दोष मुक्तता झाली आहे. त्याचा संदर्भ देवून माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणाबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने हक्कभंग दाखल करून घेण्यात यावा अशी सूचना केली. त्यानंतर अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी ही हक्कभंग सूचना स्विकारण्यात आली असल्याचे सांगत प्रकरण समितीकडे चौकशी आणि कार्यवाहीसाठी पाठविण्याची घोषणा केली.
त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी रा स्व संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी घाटकोपर येथे एका कार्यक्रमा दरम्यान मुंबईत मराठी भाषा आलीच पाहिजे असे नाही असे वक्तव्य केल्याबाबत आक्षेप घेतला. याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यानी सरकारची भुमिका स्पष्ट करायला हवी असे ते म्हणाले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भय्याजी जोशी यांनी नेमके काय वक्तव्य केले त्याबद्दल आपण माहिती घेवू मात्र राज्य सरकारची महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी भाषा अनिवार्य असल्याची पूर्वी पासून भुमिका आहे आणि तीच कायम राहणार असल्याचा निर्वाळा दिला.
यावेळी विरोधीबाकावरील सदस्यांनी आग्रही भुमिका घेत मराठी भाषेच्या समर्थनार्थ प्रश्न विचारण्याचा आग्रह धरला. आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मंत्री नितेश राणे यांच्याशी त्यांची शाब्दिक चकमक झाली. त्यावेळी दोन्ही बाजुच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने सभागृहात गदारोळ झाला. तेंव्हा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी कामकाज पाच मिनीटांसाठी तहकूब कैले.
सभागृहाच्या कामकाज पत्रिकेतील क्रमानुसार त्यानंतर लक्षवेधी सूचनांचे कामकाज पुकारण्यात आले.
लक्षवेधी नंतर सभागृहाच्या कामकाजातील सन २०२४-२५ या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चा पुकारण्यात आली. श्रीमती सुलभा खोडके, दिलीप लांडे, संजना जाधव आदी सदस्यानी यावेळी चर्चेत आपल्या मतदारसंघातील महत्वाच्या प्रश्नावर भाष्य केले.
दि ७ मार्च रोजी अधिवेशनाच्या पहिल्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सकाळी अकरा वाजता कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासाने झाली. यावेळी डॉ तानाजी सावंत आणि अन्य सदस्यांचा राज्यातील होर्डिंग्जचे लेखा परिक्षण करण्याबाबतचा प्रश्न गाजला. या प्रश्नावर सुमारे अर्धातास सभागृहात चर्चा झाली. यावेळी अनेक सदस्यांनी चर्चेत भाग घेतला. यावेळी बोलताना प्रभारी नगरविकासमंत्री उदय सावंत यांनी घाटकोपर येथे दुर्घटना झाल्यानंतर राज्यातील सर्वच नागरी भागातील होर्डिंग बाबत सर्वेक्षण करून बेकायदा होर्डिंगवर कारवाईची मोहिम राबविण्यात आली. त्यानंतर लाखौ होर्डिंगवर कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणाले. या प्रश्नावर अनेक सदस्यांनी अजुनही अनेक भागात बेकायदा होर्डिंग लावली गेली असून त्यामुळे रस्ते अपघात होत असल्याबाबत लक्ष वेधले. त्यावर माहिती घेवून कारवाई करण्याचे आश्वासन मंत्री सामंत यानी दिले.
मुंबई नाशिक महामार्गावर वडपे ते ठाणे दरम्यान रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत सुनिल प्रभू आणि अन्य सदस्यांचा तारांकीत प्रश्न होता. त्यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री दादाजी भुसे यानी या महामार्गावर राज्यातील सर्वाधिक वाहतूकीचा भार असल्याचे सांगितले. व्हिजेटीआय मार्फत या रस्त्याच्या कामाचे लेखा परिक्षण केले जात असून त्याबाबतचा अहवाल प्राप्त होताच रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदाराकडून काही कसूर केली असल्याचे दिसून आल्यास कारवाई केली जाईल असे भुसे म्हणाले.
प्रश्नोत्तराच्या तासानंतर कागदपत्रे पटलावर ठेवण्यात आली त्यात राज्याच्या सन २०२४-२५ या वर्षाचा अर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. जयंत पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला तरी त्या विषयावर सभागृहाला अवगत का केले नाही असा सवाल केला. त्यावर तालिका अध्यक्षांनी त्याबाबत सभागृहात घोषणा करण्याची प्रथा नसल्याचे सांगितले. त्यावर नाना पटोले यानी हरकत घेतली. या सभागृहात चुकीची माहिती दिली जात असल्याचे ते म्हणाले. अनेक वर्षापासून सभागृहात माहिती दिल्यानंतर ती माध्यमांसमोर देण्याची प्रथा असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर माहिती तपासून घेवून त्यावर निर्णय देण्याची घोषणा तलिका अध्यक्षांनी केली.
त्यानंतर लक्षवेधी सूचनांचे कामकाज पुकारण्यात आले. या लक्षवेधी सूचनामध्ये भिवंडीची लोकसंख्या १७ लाखाच्या वर गेली असल्याने आणि अधिक लोकसंख्या वाढत असल्याने शहरात रस्ता वाहतुकीचा प्रश्न कठीण होत असल्याचा मुद्दा रईस शेख यानी मांडला त्यावर प्रभारी नगरविकास मंत्री उदय सामंत यानी मंत्रीस्तरावर बैठक घेवून उपाय योजनांवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
डॉ राहूल पाटील यानी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्ताने परभणी शहरात पुतळा उभारण्याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर नगरविकास विभागाचे प्रभारी मंत्री उदय सामंत यानी जिल्हा विकास निधी तसेच नगरविकास विभागाच्या मार्फत याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
पुणे पिंपरी चिंचवड शहरात होणा-या नदीच्या पर्यावरणाबाबत टास्क फोर्सची स्थापना करुन प्रदुषणाला कारणीभूत घटकांचा अभ्यास करण्याबाबत प्रयत्न करत असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यानी सांगितले.
लक्षवेधी नंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला मुख्यमंत्र्याकडून उत्तर देण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बारा शिवकालीन किल्ले जागतिक वारसा केंद्र करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, शंभर दिवसांचा कार्यक्रम सध्या सुरू असून त्यात १५ एप्रिल नंतर मुल्यांकन केले जाणार असून चांगली कामगिरी करणा-या विभागाना १ मे रोजी गौरविण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्याकडून शिंदे यांच्या काळातील योजनाना स्थगिती दिल्याच्या बातम्या माध्यमातून दिल्या जात असल्याचे सांगताना ते म्हणाले की आम्ही तिघांनी पूर्वी एकत्रितपणे निर्णय घेतले असल्याने त्यात बदल करण्याबाबत आम्ही तिघे चर्चा करुनच निर्णय घेत असतोि मात्र माध्यमातून याबाबत चुकीच्या दर्जाहिन बातम्या दिल्या जात आहेत असे ते म्हणाले. योजनाना स्घगिती देण्याबाबत आपण उध्दव ठाकरे नाही असा राजकीय टोला त्यानी लगावला. राज्यात विक्रमी सोयाबीन खरेदी करण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले की त्या नंतर तूर खरदेी देखील विक्रमी केली जात आहे. राज्यात वैनगंगा नदीवर महत्वाकांक्षी प्रकल्प केला जात असून त्यामुळे विदर्भाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले. त्या प्रमाणेच उल्हास खो-यातील पाणी मराठवाड्यात आणि कोकणातील कोयनेचे पाणी देखील वाया जात असल्याने ते मराठवाड्याला देण्याबाबत योजनेवर सरकार प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
राज्यात ४५ लाख कृषीपंपाना मोफत वीज दिली जात असून येत्या पाच वर्षात टप्याटप्याने वीज दर कपात केली जाणार आहे असे ते म्हणाले. येत्या २०३० वर्षापर्यंत राज्यात ५२ ट्क्के वीज हरित ऊर्जा स्त्रोतातून दिली जाणार आहे त्यामुळे वीजेसाठी देण्यात येणा-या अनुदानात मोठी कपात होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. राज्यात मागेल त्याला सौर पंप योजना यश स्वी झाल्याचे ते म्हणाले.
मुबंई महानगर क्षेत्रातील मेट्रोच्या प्रकल्पातील बहुसंख्य कामे प्रगतीपथावर असून सन २०२७ पर्यंत सर्व मेट्रो प्रकल्प मार्गी लागणार असल्याचे ते म्हणाले. राज्यात शक्तीपिठ महामार्गाचा आराखडा तयार केला जात असून हा महामार्ग झाल्यास मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमँप असेल असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्याच्या अभिभाषणावरील उत्तरानंतर पुरवणी मागण्यांवरील चर्चा आणि मतदानाचे कामकाज घेण्यात आले दुपारी चार वाजता चर्चारोध असल्याने गृह आणि नगरविकास विभागाच्या मागण्यांवरील चर्चा पूर्ण करून उपमुख्यमंत्री अजीत पवार यानी चर्चेला ऊत्तर दिल्यानंतर मतदान घेण्यात आले. मागण्या मंजूर झाल्यानंतर महिला दिना निमित्त अध्यक्षांचा महिला दिना निमित्त विशेष प्रस्ताव चर्चेला पुकारण्यात आला. यावेळी महिलांच्या विकासाबाबत मनिषा चौधरी, लता सोनवणे, श्वेता महाले सरोज अहिरे सुलभा खोडके. इत्यादी महिला सदस्यांनी यावेळी चर्चेत भाग घेतला.
जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष प्रस्तावावर बोलताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार केला. लाडक्या बहिणींनी दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कल्याणकारी राज्याची निर्मिती केली. महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिलांचे कल्याण आणि विकास हेच राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
जागतिक महिला दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्माशताब्दी वर्षानिमित्त विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी प्रस्ताव मांडला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी महिला सन्मान आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतीय संस्कृतीत माता आणि मातृभूमीला अधिक महत्त्व दिले आहे. संविधानाने महिलांना मतदानाचा अधिकार देऊन समानता दिली आहे. भारत हा मातृभावनेने भरलेला देश आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, जिजाऊमाता, राणी लक्ष्मीबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांसारख्या स्त्रियांमुळे महाराष्ट्राचा इतिहास समृद्ध झाला. नद्यांना सुद्धा आपण मातेसमान मानतो ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभारच नव्हे, तर सामाजिक सुधारणा, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि लोककल्याणकारी योजना यावरही भर दिला. त्यांच्या कार्यपद्धतीत शाश्वत विकासाची तत्त्वे होती ती आजही मार्गदर्शक आहेत. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)