मुंबई : राज्याच्या इतिहासात प्रथमच महिला आयएएस अधिका-याला मुख्य सचिव होण्याची संधी असल्याची शक्यता मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. राज्याचे मुख्यसचिव सिताराम कुंटे या महिना अखेर निवृत्त होत आहेत. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून सेवाज्येष्ठ ते नुसार मनुकुमार श्रीवास्तव यांचे नाव असले तरी राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीत कुंटे याना मुदतवाढ मिळणे आणि श्रीवास्तव यांना त्यांच्या जागी पदभार मिळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील सूत्रांनी दिली आहे.
राज्याला प्रथमच महिला मुख्य सचिव
त्यांची निवड झाल्यास राज्याला प्रथमच महिला मुख्य सचिव मिळण्याची शक्यता आहे. त्या पूर्वी फडणवीस सरकारच्या काळात सुमित मलिक यांच्या नंतर मेधा गाडगीळ यांचे नावही या पदासाठी सेवा ज्येष्ठतेनुसार अपेक्षीत होते मात्र फडणवीस सरकारने त्यांची निवड केली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यात मुख्यसचिव पदासाठी सनदी अधिका-यामध्ये जोरदार ओढाताण असून त्यात सेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांच्या मर्जीतील अधिका-याची वर्णी लागणार आहे.
कुंटे यांना मुदतवाढ नाहीच
या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या केंद्र आणि राज्य यांच्यातील तणावपूर्ण संबंधामुळे कुंटे यांच्या मुदतवाढीच्या प्रस्तावाला केंद्राकडून मंजूरी मिळण्याची शक्यता धुसर आहे, त्याच प्रमाणे अन्य अधिका-यांवर अन्याय करत कुंटे यांना मुदतवाढ देण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे स्वत: इच्छुक नाहीत.
सनदी अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच
कुंटे यांच्या रिक्त जागेवर शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्यामलाल गोयल यांचा सेवा ज्येष्ठतेनुसार क्रमांक लागतो. त्या खालोखाल वंदना कृष्णा, आणि अतिरिक्त प्रधान सचिव देवाशिष चक्रवर्ती यांचाही क्रमांक लागतो हे सारे १९८५च्या बँचचे अधिकारी आहेत. त्याशिवाय गृहसचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच आणि एसीएस जयश्री मुखर्जी यांचाही क्रमांक लागतो हे दोघे १९८६च्या बँचेचे अधिकारी आहेत. त्या खालोखाल एसीएस सुजाता सौनिक, अश्विनीकुमार आणि मनोज सौनिक यांचा क्रम लागतो हे सारे १९८७च्या बँचेचे अधिकारी आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सध्या या सर्वात नव्या मुख्य सचिव म्हणून पहिल्यांदाच महिला अधिकारी सुजाता सौनिक यांचे नांव सर्वात पुढे आहे.