मुंबई : १ डिसेंबर रोजीच्या जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेच्या (MDACS / एमडॅक्स) वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई महानगरपालिका अर्थसहाय्यित मुंबईतील एआरटी केंद्रातून उपचार घेणा-या एचआयव्ही / एड्स संक्रमित(AIDS Infected) महिलांसाठी आर्थिक सहाय्य योजने अंतर्गत नोंदणीकृत असणा-या महिलांकरिता शुक्रवारी ३ डिसेंबर रोजी ‘स्वयम् महिला मेळावा’ चे आयोजन करण्यात आले होते. एआरटी केंद्रातील नोंदणीकृत २६० महिलांनी या मेळाव्यात सहभाग घेतला. प्रकल्प संचालक (मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था) तथा उप आयुक्त (परिमंडळ २) हर्षद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
एचआयव्हीसह जगणा-या विधवा महिलांना एचआयव्हीशी निगडित कलंक व भेदभावामुळे कौटुंबिक, सामाजिक व आर्थिक स्तरावर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे लक्षात घेऊन लाभार्थी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सबल करण्याकरिता ‘स्वयम् महिला गट’ या आधार गटाची सुरुवात करण्यात आली आहे.
जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून एमडॅक्सद्वारे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच अंतर्गत शुक्रवारी ३ डिसेंबर रोजी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान विविध सत्रांमधून पौष्टीक आहाराचे महत्त्व, पाककृतींचे प्रात्यक्षिक तसेच आरोग्यदायी जीवनासाठी योगाभ्यासाचे महत्त्व इत्यादी बाबीदेखील प्रात्यक्षिकांसह समजावून सांगण्यात आल्या. तसेच या आरोग्य मेळाव्यात रक्तदाब, मधुमेह, बोन डेन्सीटी इत्यादी चाचण्यांचेही आयोजन करण्यात आले होते.