जागतिक अन्नसाखळीमध्ये जलीय परिसंस्थांचे महत्व अनन्यसाधारण आहे. या भागात पाणी पूर्णपणे किंवा अंशत: उथळ असते. सूर्यप्रकाशाच्या विपूल उपलब्धतेमुळे या परिसंस्थांमधील जैवविविधता लक्षणीय असते. दरवर्षी 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा केला जातो. जैविक वैविध्याला जीवंत ठेवण्यात आणि ते वाढविण्यात पाणथळांची भूमिका अत्यंत मोलाची असते.
पाणथळ प्रदेश म्हणजे काय?
बहुउपयोगी पाणथळ प्रदेश.
पक्षी आणि पाणथळ प्रदेश.
आपण काय करू शकतो?
इराणमधील कॅस्पियन या समुद्राच्या किनाऱ्यावरील ‘रामसर ‘ या शहरी ‘ पाणथळ प्रदेशाचे महत्त्व ‘ या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. पाणथळ प्रदेशांना मानवी जीवनात असलेले स्थान सर्वांना समजावे या हेतूने दर वर्षी २ फेब्रुवारी हा दिवस ‘वेटलँड्स डे’ साजरा केला जावा असा निर्णय या परिषदेत घेतला गेला. असा पहिला दिवस १९९७ साली साजरा करण्यात आला होता.
पाणथळ प्रदेश म्हणजे काय?
नदी(Rivers), तलाव(lakes), सागरी किनारे(beaches) अशा ठिकाणी उथळ पाण्याने झाकलेल्या व अनेकविध प्रकारच्या गवतांनी आणि झुडपांनी भरलेल्या पाणथळ जमिनी आपल्याला आढळतात. यामध्ये कृत्रिम तलाव व कालवे, मिठागरे, सांडपाण्याचे तलाव, मत्स्यशेती तलाव, शेततळी, भाताची खाचरे अशा मानवनिर्मित स्थळांचाही समावेश होतो.
बहुउपयोगी पाणथळ प्रदेश.
सध्या आपण भूगर्भातील पाण्याचा भरपूर वापर करतो. या पाण्याचे पुनर्भरण करण्याचे काम असे प्रदेश करतात. अनेकदा आपण प्रदूषित पाणी व इतर हानिकारक द्रव्ये अशा प्रदेशात फेकतो खरे; परंतु पाणथळ जागी वाढणा-या वनस्पतीच या घटकांना गाळण्याचे काम करून पाणी शुद्ध करतात.
उदा. कोलकात्यातून बाहेर टाकल्या जाणा-या घाण पाण्याचा काही भाग शुध्द करण्यासाठी जवळच्या पाणथळ प्रदेशाचा वापर केला जातो.
भातखाचरे आणि मत्सबीज – उत्पादनासाठी बनवलेली तळी हे देखील पाणथळ प्रदेशच असल्याने त्यांमधून जगभरातील ३ अब्ज लोकांना दररोजचे अन्न ( भात आणि मासे) मिळते. सागरी किनारपट्टीवर असलेल्या अशा गवतयुक्त पाणथळ प्रदेशांमुळे लाटांनी होणारी किना-यांची धूप थांबवली जाऊन वादळांपासून होणारे नुकसानही घटते. शिवाय समुद्राचे आक्रमण थोपवून किनारी जमीन अतिक्षारयुक्त (निरुपयोगी खारपड) होण्याची क्रियाही तेथील ‘मॅनग्रुव’(Mangrove) (खारफुटी) प्रकारच्या झुडपांमुळे कमी होते. नदीला पूर आल्यास किंवा अतिवृष्टी झाल्यासही हे जास्तीचे पाणी किनारी पाणथळ प्रदेशात मुरते व मानवी वस्ती जलमय होण्याच्या संभाव्य धोक्याचे प्रमाण कमी होते. महाराष्ट्राचा विचार केल्यास असे दिसते की इथले महत्त्वाचे पाणथळ प्रदेश हे दख्खनच्या पठारावरील नद्या- उपनद्या, धरणांमागील जलाशय आणि पाझर तलावांच्या आसपासच्या परिसंस्था आहेत. यामुळे भूजलाचे पुनर्भरण आणि पाझर यात मोलाची मदत होते.
पक्षी आणि पाणथळ प्रदेश
बगळे, बदके, करकोचे, खंड्या तसेच शिकारी प्रजातींच्या व इतरही अनेक पक्ष्यांना पाणथळ प्रदेशांतूनच अधिवास मिळतो. ‘प्लवर’ सारख्या विशिष्ट प्रजातींची घरटी पाणथळ प्रदेशांत आढळतात. करकोचे, शराटी (इबिस), चमचा, रोहित (फ्लेमिंगो) हे पक्षीही पाणथळ जागीच येतात. अगदी सायबेरियासारख्या प्रदेशांतूनही क्रेन आणि बदके इथे येतात. कारण इथे त्यांना अन्न मिळते. हे पक्षी या प्रदेशातील अन्नसाखळीतला एक महत्त्वाचा दुवा असतात.
आपण काय करू शकतो?
दुर्दैवाने आज पाणथळ प्रदेशांकडे ‘वाया गेलेली जमीन’ म्हणूनच पाहिले जाते, पण जैविक आणि पर्यावरणीय साखळीतील त्यांचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन ते जतन करून, तिथला कचरा इ. दूर करून त्यांचा सजगतेने वापर करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वैयक्तिक पातळीवर सुध्दा पाणथळ प्रदेश वाचविण्याचा प्रयत्न केला तरी या दिशेने एक ठोस पाऊल उचलले जाऊ शकते. आपल्या प्रत्येकाच्या खारीच्या वाटयाने पृथ्वीवरची ही महत्त्वाची समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते आणि पर्यावरणाची झीज राखली जाऊ शकते.
Tag-“World Wetlands Day – February 2″/