या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता…

“नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नम:। नम: प्रकृत्यै भद्रायै नियता: प्रणता:स्म ताम्॥1॥“
“श्रीदेवी सूक्तम्”, ही मार्कंडेय पुराणातली देवीस्तुती. या ३० सामर्थ्यशाली ऋचांपैकी “या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता..” ही बारावी ऋचा. हे, देवाधीदेवांनी, देवीचे कृतज्ञतापूर्वक केलेले नमन आहे. वेद-पुराणात देवीची अनेक रूपे वर्णिली आहेत. प्रेमळ, यशोदायी, बुद्धिदाता, रणरागिणी. या रुपाला अनेक छटा आहेत. प्रेम, माया, त्याग, स्वार्थ, अहंकार, मत्सर, बऱ्या-वाईट सुद्धा. परंतु या सगळ्यांचं एक रूप मात्र सारखंच असतं, ते म्हणजे “स्त्री” म्हणजेच “नारी”. ही “लढवैयी” असते. ठाकलेल्या संकटांचा, धैर्याने संहार करणारी, परिस्थितीला हार न मानणारी, अशी ही नारी शक्ती.

कुठलेही कार्य करण्यासाठी “शक्ती”ची आवश्यकता असते. मंगलाची केवळ कामना करून चालत नाही, तर मंगलाची पावलं आपल्या परसात आणण्यासाठी मनगटात ताकद हवी असते आणि तशी ताकद देण्याची किमया शक्तीच्या उपासनेतून येते. “उपासनेला दृढ चालवावे” असं म्हटलं जातं. परंतु हीच उपासना दृढतेने चालविण्यासाठी मन सुद्धा निग्रही हवं आणि तसं कणखर, बलवान मन करण्याची कुवत देवी उपासनेत आहे. या ऊर्जेतून दूरवरच्या अवाढव्य आणि तेजस्वी अशा तार्यांयचा तसेच सूक्ष्म अशा मानवी मनाचा आणि त्यात निर्माण होणाऱ्या भावनांचा जन्म झाला, ती “ऊर्जा” म्हणजे देवी होय. ज्या शक्तीला ऊर्जा या नावाने ओळखतात, तीच शक्ती या समस्त ब्रम्हांडाला सतत कार्यरत ठेवण्यासाठी कारणीभूत आहे. स्त्री ची देवी स्वरूपात म्हणजे मातृत्वाची आद्यशक्तीच्या स्वरूपात आराधना केली जाते. “जगदंबा म्हणजेच जगत जननी म्हणजेच जगत ज्योती” असे दासबोधात समर्थांनी वर्णन केले आहे. तुळजाभवानी, महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती, रेणुका माता अशा नाना विध रूपांनी देवीची पूजा केली जाते. ती भगवंताची शक्ती आहे. संतत्वा पर्यंत आपली प्रगती झाली पाहिजे. त्यासाठी शक्तीची आवश्यकता आहे. त्या शक्तीचे आवाहन करण्यासाठी नवरात्रोत्सव असतो. नवरात्र म्हणजे देवी मातेच्या अनंत रूपांना मनोभावे वंदन करण्याचा काळ, आपल्यात स्वयंसिध्द असलेल्या तिच्या शक्तींचे, दैवी गुणांचे अवधानपूर्वक अवलोकन करून त्यांना जागृत करण्याचा अवसर.
भारतीय तत्वज्ञानानुसार, समाजाच्या अस्तित्वाचा त्रिकोण आखून देण्यात आला आहे. या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधा व समृद्धी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्तीदेणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदू मध्ये ज्ञान कल्पना देणारी महासरस्वती असते.

“दिव्यत्व सर्व समावेशक आहे परंतु ते सुप्त असते. पूजा आणि आराधनेच्या प्रक्रियेमुळे ते जागृत केले जाते”. नवरात्रीमध्ये या उर्जेची विविध नावांनी आणि रूपांमध्ये आराधना केली जाते, तिला जाणले जाते, समजून घेतले जाते. देवी शक्तीची तीन प्रमुख रूपे आहेत. दुर्गादेवी संरक्षणाची देवता. नवरात्रीतील पहिल्या तीन दिवसात देवीच्या दुर्गा रूपाची आराधना केली जाते. यात नकारात्मक शक्ती नाहीशा होतात. दुर्गा देवी, नकारात्मकतेला सकारात्मकतेत परिवर्तित करते. ही निश्चित विजय प्राप्त करून देणारी असल्याने आपण “जयदुर्गा” असं म्हणतो. “आळस, अश्रद्धा, अज्ञान, शरणागतीला बंधन”| (प्रार्थना स्तोत्र). आळस, मरगळ, जडत्व या गुणांमुळे आपल्या भौतिक आणि अध्यात्मिक जीवनात अडसर निर्माण होतो. देवी सकारात्मक उर्जेने ओतप्रोत भरलेली असते, जिच्या स्मरणाने हा आळस, मरगळ आणि जडत्व नाहीसे होतात.

नवरात्राच्या पुढील तीन दिवसात देवीची “लक्ष्मी” रूपात आराधना केली जाते. लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची देवता आहे. संपत्ती म्हणजे केवळ धन नव्हे तर ज्ञान, उपजत कला आणि कौशल्य यांची प्राप्ती होय. लक्ष्मी म्हणजे मानवाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गरजेची भौतिक आणि अध्यात्मिक पूर्तीचे प्रगटीकरण आहे. श्रीदेवी सूक्तात याचं वर्णन, “या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रुपेण संस्थिता..” असं केलं आहे. नवरात्रात अष्टलक्ष्मीचं महत्त्व हे अनन्य साधारण आहे. देवी लक्ष्मी आपल्या सर्वांच्या जीवनात या विविध रूपांनी प्रसन्न होवून कृपा करते. हे तीन दिवस देवी लक्ष्मीला समर्पित असतात.

शेवटचे तीन दिवस हे “सरस्वती” मातेला समर्पित आहेत. सरस्वती ही ज्ञान देवता आहे. “हे सरस्वती, नमन तुझ्या पदकमली” ही प्रार्थना आपण बालपणापासून म्हणतो. देवी सरस्वती आपणास “स्व” चे ज्ञान, सार देते. देवी सरस्वती आपल्याच चेतनेचे स्वरूप आहे जी विविध गोष्टी शिकविण्यासाठी उद्युक्त करीत असते. तीच अज्ञान दूर करणारी, ज्ञानाची आणि अध्यात्मिक प्रकाशाची स्त्रोत आहे.

नवरात्रीच्या काळात आपण नऊ देवींचे एक एक दिवशी पूजन करत असतो.
त्यातली पहिल्या दिवशी पुजली जाणारी शैलपुत्री ही देवता, दृढता, कठोर साधनेची शिकवण देत असते. त्याप्रमाणे कठोर साधना करणाऱ्या साधकांवर कृपा करून मोक्षप्राप्तीसाठी दृढ संकल्प होण्यास ती साधकांना साहाय्य करते. ज्यांना मोक्षप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी, सतत अभ्यासाने आपले ध्येय साध्य करून घ्यावे. सतत आत्मचिंतन करावे. याचे प्रतीक म्हणून ब्रह्मचारिणी देवीने जपमाळ हातात धारण केलेली आहे. चंद्रघंटा देवी च्या कृपेने साधक सकारात्मक कल्पना करू लागतो.साधकाच्या मनातील संस्कारांचा नाश करून त्याला ईश्वर पलायन होण्यास मदत करते ती कुष्मांडा देवी.

आपल्याला मनातील असुरांचा नाश करायचा आहे त्यासाठी आवश्यक संयम विवेक धैर्य प्रदान करते ती स्कंदमाता. अंतकरणात इष्ट देवतेचे स्मरण चिंतन करण्याची शक्ती प्रदान करते ती कात्यायनी. अंतकरणातील प्रवृत्ती स्वतःमध्ये सामावून घेऊन कर्मा नंतर निद्रा घालून शक्ती प्रदान करते म्हणून तिला कालरात्री संबोधण्यात येते.
आस्था, श्रद्धा व विश्वासाने सुसंपन्न होण्याचा संदेश महागौरी देत असते. ती पावित्र्य प्रदान करते. शरीराच्या स्वच्छते बरोबरच साधक अंतकरणाने व वाणीने पवित्र असावा.
कधीकधी साधक साशंक होतो. सिद्धीदात्री त्याला उद्दिष्टपूर्ती परत नेऊन त्याची मनोकामना पूर्ण करते.

अशा नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या या देवींचे महात्म्य आपल्याला सांगितलं गेलेले आहे. देवी म्हणजेच शक्ती रूपिणी आहे. आज आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा येणाऱ्या विविध संकटांवर, मनोवृत्तीवर, मात करण्यासाठी या विविध देवतांनी आपल्याला केलेला उपदेश हा खरोखरीच अत्यंत मोलाचा ठरतो. नवरात्रीच्या पावन पर्वात “स्त्री शक्तीची” जाणीव आपसूकच सर्वांना होते. विशेष काही करून दाखविण्याचा मनाचा पक्का निर्धार निश्चित असेल तर काहीच अशक्य नाही. “विद्या समस्तास्तव देवी भेद:| स्त्रिया: समस्त: सकला जगस्तु|” हे देवी, या जगातील सर्व विद्या तुझ्या पासूनच प्रगट होतात आणि सर्व स्त्रिया हे तुझेच रूप आहे.

प्राचीन काळापासून आपल्या देशातल्या महिलांना दिला जाणारा सन्मान, त्यांचं समाजातलं स्थान आणि त्यांनी दिलेले योगदान अवर्णनीय आहे. आपल्या भारत देशात महान “विदुषी”न ची एक मोठी परंपरा आहे. वेदांमध्ये ऋचांची निर्मिती करण्यामध्ये भारतातल्या अनेक महत्त्वपूर्ण विदुषीचे योगदान आहे. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेच आहे. “दशपुत्र समा कन्या, दशपुत्रा प्रवर्धयन|यत्फलमलभते मर्त्य, तत लभ्यं कन्य कैकया|. एक कन्या दहा मुलांच्या बरोबरीची असते. दहा पुत्रांमुळे जे पुण्य मिळते तेवढीच पुण्यप्राप्ती एका कन्ये कडून मिळते. हीच नारीशक्ती संपूर्ण देशाला, समाजाला, आपल्या कुटुंबाला एकतेच्या धाग्यात बांधून ठेवत असते. वैदिक काळातील लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी या सारख्या महान विद्वत्ता असलेल्या विदुषी असोत किंवा अक्कामहादेवी, मीराबाई सारख्या महान ज्ञानी आणि भक्ती मार्गातल्या संत. अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या शासन व्यवस्था पाहणाऱ्या असो वा राणीलक्ष्मीबाई यांच्यासारख्या शूर रणरागिणी असो, स्त्री शक्ती नेहमीच आपल्याला प्रेरणा देत असते. सोबतच देशाचा मानसन्मान वृद्धिंगत करीत असते. अशा या महान स्त्रीशक्तीचा आदर्श समोर ठेवून त्याप्रमाणे आपले आयुष्य, आपला परिवार, आपला समाज आणि आपले राष्ट्र सुंदर, उदात्त, उत्तम करण्याचा प्रयत्न नारीशक्ती करती आहे. आणि म्हणूनच आम्हा समस्त भारत वासियांना त्यांचा सार्थ अभिमान आहे.

शक्ती जशी देवांची जननी आहे तशीच ती असूरांचीही जननी आहे. दोघेही आपापल्या भावनेनुसार शक्ती साधनेस प्रवृत्त होतात आणि आपल्या मनोदेशानुसार फलप्राप्ती करतात.
असुरांची चेतना ही नेहमीच आपल्या अहंकारामुळे व अज्ञानामुळे सृष्टीच्या कार्यात बाधा उत्पन्न करीत असते, म्हणूनच श्री भगवान व जगन्माता विविध रूपे धारण करून त्यांचा विनाश करतात. अहंकारामुळे प्रेरित झालेली बुद्धी नेहमीच कुटील, कलुषित असते. तिच्या विचारात, तिच्या चिंतनात कधीही व्यापकता विशालता येऊ शकत नाही. सर्वांच्या कल्याणाची गोष्ट कधी त्यांच्या चिंतनात येऊ शकत नाही. त्यांचे चिंतन, त्यांचे विचार, सर्वदा क्षुद्रता, स्वार्थ, यांच्या अधीन असतात. म्हणून सृष्टीचा सृजन कार्याच्या व्यापक विस्तारासाठी या लोकांचा विनाश करणे आवश्यक होऊन जाते. निसर्गाचा प्रवाह सदैव कसलाच अवरोध, विरोध सहन न करता प्रवाहित होत राहायला पाहिजे, म्हणूनच स्वतः प्रकृती त्यासाठी विनाशाचे सरंजाम उभे करून ठेवते.

या संसारातील प्रत्येक गोष्ट शक्तींनी व्यापलेली आहे. कुठे सूप्त तर कुठे प्रगट. स्वरुप बदललेले. पण शक्तीचे असणे असतेच. शरीरामध्ये प्राणशक्तीी, आत्मशक्ती रुपात तूच असतेस. देवी स्वरूप शक्ती स्वरूपिणी आहे. नवरात्रात शक्तीचे जागरण केलं जातं. शक्ती तर दे पण त्याचबरोबर तिचा योग्य प्रकारे विनियोग करण्याची बुद्धी सामर्थ्य दे. आपल्या सुप्त शक्तींचा उदय होणे, भक्ताची भक्ती फलद्रूप होणे आणि परमेश्वराचा अनुभव येणे, गुरुकृपेने त्याला शक्ती मिळते हे सर्व घडणे शक्य आहे, ते केवळ आद्यशक्ती आदिमायेमुळे. संपूर्णपणे तिला जाणणे माणसाला शक्य नाही, पण काही प्रमाणात तिचे स्वरूप मात्र समजू शकतो. देवी म्हणजे लीला रूपातील ब्रह्म. देवीची उपासना म्हणजे ब्रह्माची, माता म्हणून, प्रेमाची घनीभूत मूर्ती म्हणून पूजा.

ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे, “ते कुंडलिनी जगदंबा| चैतन्य चक्रवर्तीची शोभा| जिया विश्वबीजाचीया कोंभा| साऊली केली||”. ती कुंडलिनी म्हणजे जगदंबा म्हणजेच चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जिने विश्वबीजाच्या उगवून आलेल्या अंकुरावर सावली धरली आहे.
आपला महाराष्ट्र सुद्धा अशा देवींच्या पवित्र स्थानांनी संपन्न आहे. महाराष्ट्रात सह्याद्रीचे असे शिखर, कुहर, विवर क्वचितच आढळेल, जे शिवशक्तीच्या निवासाने पावन झालेले नाही. वऱ्हाडच्या, माहूरच्या रेणुके पासून गोव्यातल्या कवळ्यांच्या शांतादुर्गेपर्यंत, महाराष्ट्रात डोंगरपठारावर वा सागरतीरावर ठिकठिकाणी जगदंबा प्रगटली आहे. आमच्या अभ्युदय नी:श्रेयसाची चिंता वाहत जागोजागी ती उभी आहे. जणू काही हिमालयाच्या उत्तुंग गौरी शिखरावर अत्युग्र तप केल्यावर शिवाचा साक्षात्कार झालेली उमा, व्रतसांगते-साठी दक्षिण समुद्राचे स्नान करायला म्हणून विंध्य पर्वत ओलांडून ती दंडकारण्यात आली, ती मग कुठे रेणुका, कुठे अंबा, कुठे भवानी, कुठे योगेश्वरी, कुठे महालक्ष्मी, कुठे दुर्गा म्हणून आपल्या अनंत रूपांनी इथे कायमची राहिली. रावणाने सीतेला पळवून नेल्यावर तिचा शोध करीत दंडकारण्यात हिंडत असलेल्या राम-लक्ष्मणांना, तिनेच विजयाचा वर देऊन रावण वधाचा मार्ग मोकळा केला व दंडकारण्य मनुष्यवस्तीला निर्भय करून दिले. “तुळजावराचेनि गुणे| रामें रावण मारिला||. म्हणून तर चैत्रात देवीचे व रामाचे नवरात्र एकाच वेळी येते आणि आश्विनात देवीचे नवरात्र संपले की दसऱ्याला रावण जाळतात.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत देवीचे महात्म्य हे अनन्यसाधारण आहे. स्वराज्य संस्थापनेचा वाड.निश्चय या आदिशक्ती भवानी मातेच्या साक्षीने शिवरायांनी घेतला आणि तिच्याच कृपेने राजे सिंहासनारूढ झालेत. समर्थ रामदासांनी तिला रामवरदायिनी म्हणून आळविले. “दैत्य संहारिले मागे| ऐसे उदंड ऐकतो| परंतु रोकडे काही| मूळ सामर्थ्य दाखवी| अशा शब्दात साकडे घातले. त्याच वेळी शिव राज्याभिषेकाच्या समयी, ओथंबून आलेल्या ढगासारखी भवानी मातेची कृपा वर्षु लागली, अशी ग्वाही दिली. “ बोलता भवानी माता| महिंद्र दास्य इच्छिती| बोलणे हे प्रचीतीचे| अन्यथा वाउगे नव्हे||.

स्वातंत्र्य युद्धातील क्रांतिकारक हेसुद्धा देवीचे उपासक होते. बंगालच्या फाळणी आंदोलनात क्रांतिकारक बिपिन चंद्र पाल, सतीश चंद्र बोस, अरविंद घोष, सखारामपंत देऊसकर, चित्तरंजन दास, ब्रह्म बांधव उपाध्याय, खुदीराम बोस इत्यादी प्रवर्तक व कार्यकर्ते यांना बंकिमचंद्र चटर्जीच्या “आनंद मठापासून स्फूर्ती मिळाली होती. त्या कादंबरीतले “वंदे मातरम” गीत त्यांचे संग्राम गीत होते. भारत मातेकडे “त्वम् हि दुर्गा दशप्रहरणधारिणी” म्हणजे दहा हातात दहा हत्यारे धारण केलेली साक्षात दुर्गा या उत्कट भक्तीभावानेच त्यांनी पाहिले. चाफेकरांपासून राजगुरुंपर्यंत महाराष्ट्रात वासुदेव बळवंतांनंतर १८९० ते १९३५ पर्यंत जे क्रांतिवीर उत्पन्न झाले तेही बहुतेक शक्तीचे आवाहक उपासक होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तर स्वातंत्र्य देवतेला स्तोत्र सुमन अर्पित केलं. “जयोस्तु ते श्रीमहन्मंगले। शिवास्पदे: शुभदे्| स्वतंत्रते भगवती। त्वामहं यशोयुतां वंदे|”. जगन्माता, मायभूमी, व स्वतंत्रता ही तीनही त्या आदिशाक्तीचीच रूपे होत, अशी या सगळ्या क्रांतीकारकांची भावना होती.

संपूर्ण जग आज ज्या भारताकडे विश्वगुरु म्हणून बघत आहे, त्या भारताची निर्मिती विश्व शक्तीनेच केली आहे. मानवी जीवनाची विविध क्षेत्रे पादाक्रांत करणारी आमची आजची मातृशक्ती देशाच नाव उज्वल करती आहे. आजही शक्तिरूप नारी आपल्याला कार्यरत दिसतात. “सुशीला: सुधीर: समर्था समेत:” अशी सर्वगुण संपन्न स्त्री मातृशक्ती म्हणून कोणत्याही बाबतीत कमी नाही. सावित्रीबाई फुले, डॉ. मंदाकिनी आमटे, राणी बंग, कल्पना चावला, सानिया मिर्झा, एवढाच कशाला “सुखोई-३०” या लढावू विमानातून उड्डाण भरणाऱ्या भारताच्या पहिल्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन. अगदी आपल्या आजूबाजूला सुद्धा अनेक क्षेत्र आहेत की त्यामध्ये आमच्या महिलांनी आपापल्या क्षेत्रात अगदी पहिल्यांदा वेगळे काही केले आहे. अशा असामान्य कामगिरी करणाऱ्या महिला शक्तीने देश आणि समाजामध्ये होत असलेल्या सकारात्मक परिवर्तनात खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
स्त्रीची देवी रूपात म्हणजे मातृत्वाचे आद्य शक्तीच्या स्वरूपात अत्यंत उत्कट व अर्थपूर्ण उपासना संपूर्ण जगात भारता खेरीज अन्यत्र कुठेच होत नाही. हे खरं, तर आमचं भाग्य आहे. कारण जगन्माता आद्यशक्ती ही ब्रह्माची सर्वप्रथम व सर्वश्रेष्ठ अभिव्यक्ती होय.
“एकैव सा महाशक्ती: तथा सर्वमिदं ततम|” ती शक्ती एकच असून जगताला धारण करणारी असल्यामुळे जगज्जननी म्हणविते तर कधी जगताचे पालण, पोषण आणि रक्षण करीत असल्यामुळे परमपिता म्हटली जाते. याच सत्यतेला श्री देवी सूक्ताच्या सातव्या ऋचेत “या देवी सर्व भूतेषु चेतनेत्यभिधीयते| नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम||

असं म्हटल आहे. शक्ती साधनेचा मुळ उद्देश पराशक्तीसोबत जुळणे आहे. जी आदिशक्ती, परमात्मा, परब्रह्म, सच्चिदानंदरूप, आत्मस्वरूप, चैतन्यरूप असते. यांचे सोबत जुळण्यासाठी श्रद्धाभाव असणे आवश्यक आहे. श्रद्धाभावाचा उदय झाल्याशिवाय अध्यात्मिक ध्येयाची प्राप्ती कठीण समजली जाते. आपण सारे या समाजाचे घटक आहोत. म्हणून आपली साधना आपल्या बरोबरच समाजाच्या उत्थानासाठी व विकासासाठी उपयोगात यायला हवी, आणि त्यासाठी शक्तीची उपासना हे एक प्रभावी साधन आहे.
“वसुदैव कुटुंबकम” ही तर आमची संस्कृती. आजच्या या कोरोना महामारीचे वेळी संपूर्ण समाजाला या विषाणूंच्या विळख्यातून मुक्ती मिळू दे. आम्हा सगळ्यांना मास्क वापरण्याची, सामाजिक दुरत्वाचे भान राखण्याची प्रेरणा दे, लसीकरण करवून घेण्याची सद्बुद्धी दे.
“शारदाम्बे हे सरस्वती करी कृपा आम्हावरी| तुष्टीदायक, पुष्टीदायक ज्ञान जागो अंतरी|”
शारदा, सरस्वती व अंबा ह्या तिघींची कृपा होऊन, ज्ञान अंत:करणात जागृत व्हावे, ही समर्थ सद्गुरू माऊलींचे चरणी विनम्र प्रार्थना.

 

श्रीकांत भास्कर तिजारे
मोबाईल क्रमांक : 9423383966 / 7038839762
ई मेल : devima9762@gmail.com


महात्मा गांधी हे आजन्म व्रतस्थ जीवन जगलेत. –

गांधीजींचे – एकादश व्रत

Social Media