सुशांतसिंह राजपूतच्या निधनाने सिनेसृष्टीने एक तरुण प्रतिभाशाली अभिनेता अकाली गमावला!: बाळासाहेब थोरात

मुंबई, दि. 14 जून 2020 : अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या करुन जीवन संपवल्याचे वृत्त हे अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी त्याने अशा पद्धतीने घेतलेली एक्झीट मनाला चटका लावून गेली. सुशांतच्या निधनाने चित्रपटसृष्टीने एक तरुण प्रतिभाशाली अभिनेता गमावला आहे, अशा शब्दात महसूलमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

सुशांतने एक टीव्ही अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली होती. किस देश में है मेरा दिल, या टीव्ही सिरिअलमध्ये त्याने पहिल्यांदा काम केले. त्यानंतर पवित्र रिश्ता या सिरिअलने तो घराघरात पोहचला. त्यानंतर सुशांतने हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून ‘काय पो छे’  या चित्रपटातून काम केले. ‘शुद्ध देसी रोमांस’, छिछोरे, सोनचिडीया, केदारनाथ या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावर आधारीत ‘एम एस धोनी एनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपटही रसिकांच्या मनात घर करुन गेला.

सुशांतने एवढ्या कमी वयात जीवनाचा शेवट केल्याने  सर्वांनाच धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो. सुशांतसिंह राजपूत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राजपूत कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे थोरात म्हणाले.

Social Media