मुंबई : रिपब्लिकन चॅनलचे मालक, संपादक अर्णब गोस्वामी यांना आज रायगड पोलीसांकडून अटक करण्यात आली. या संदर्भात गृहविभागाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने स्थानिक न्यायालयात या प्रकरणी फेरचौकशी साठी अर्ज दाखल केला होता. त्याबाबत न्यायालयाने केवळ फेरचौकशीच नव्हे तर नाईक कुटूंबियांचे जबाब नोंदवून घेतल्यानंतर राज्य सरकारला चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी विरोधीपक्षानी दिलेल्या माहितीचा प्रतिवाद करताना राज्याचे परिवहनमंत्री ऍड अनिल परब यांनी न्यायालयाच्या परवानगीनेच सरकारने कारवाई केल्याचा दावा केला आहे.
दरम्यान गोस्वामी यांच्या अटकेचा प्रतिकार करताना भारतीय जनता पक्षाच्या राज्यभरातील नेत्यांनी या प्रकरणी राज्य सरकार सूडाची कारवा करत असल्याचा आरोप केला आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या अपयशाबद्दल आणि चुकांबद्दल जाहीर सवाल करणारे पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकरवी अटक करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला आहे. ठाकरे सरकारची ही कृती आणीबाणीबातील दडपशाहीची आठवण करून देणारी आहे. भारतीय जनता पार्टी या दडपशाहीचा निषेध करते, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
राज्य सरकारने रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करत असून १९७५ च्या आणीबाणीची केवळ समर्थक असलेली शिवसेना आज गांधी परिवाराच्या दबावाखाली येऊन आणीबाणीची व्यवस्थापक बनली आहे अशी टीका भाजपा नेते आशीष शेलार यांनी केली. भाजपा मुंबई कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी भाजपा मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये उपस्थित होते. शेलार म्हणाले की, नियतीचं कालचक्र कसे असते ते आजच्या अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील समाज माध्यमातून प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, १९७४ साली इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसने देशात आणीबाणी जाहीर केली तेव्हा शिवसेनेने त्यांचे समर्थन केले होते. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या शिवसेनेने सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्या दबावाखाली येऊन सूडबुद्धीने कारवाई करत आणीबाणीचे जणू व्यवस्थापनच केल्याचे चित्र आहे.
भाजप खासदार नारायण राणे, माजी मंत्री गिरिश महाजन यांनी देखील राज्य सरकारच्या कारवाईचा निषेध केला आहे. तर राज्यभरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी या विरोधात निदर्शने देखील केली आहेत. भाजप नेते डॉ किरिट सोमैय्या यांनी थेट अलिबागला जावून गोस्वामी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना मज्जाव केला.
पत्रकार संघटनाकडून मात्र या प्रकरणी संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असून राज्यातील अनेक संघटनानी या प्रकरणी पत्रकारिता म्हणून सत्याच्या बाजूने मत व्यक्त करत चौकशीनंतर योग्य तो न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे; मात्र एडिटर्स गिल्ड या संघटनेने या प्रकणी निषेधाचा सूर व्यक्त केला आहे. हा अभिव्यक्तीच्या गळचेपीचा मुद्दा असल्याबाबत शिवसेनेचे प्रवक्ता संजय राऊत यांनी इन्कार केला असून कायद्याच्या प्रक्रीयेनुसार कारवाई होत असून सूडाने केली नसल्याचा खुलासा केला आहे.
असे आहे प्रकरण.?
२०१८च्या मे मध्ये अलिबागच्या कावीर येथील वास्तुविषारद अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केली होती. अर्नब गोस्वामी यांच्याकडून रिपब्लिक टिव्हीच्या स्टुडियोच्या कामाची भली मोठी रक्कम काम करूनही देण्यात न आल्याने नाईक यांनी आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत नमूद केले होते. गोस्वामी यांच्या विरोधात तेव्हा अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता मात्र त्यावर पुढे कोणतीच कारवाई झाली नव्हती. त्यामुळे अन्वय नाईक यांच्या पत्नीने या प़करणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प़करण सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. अलिबाग गुन्हा अन्वेषण विभागाने स्थानिक न्यायालयाची परवानगी मिळवून चौकशी साठी गोस्वामी यांना अटक केली.