आत्मनिर्भर भारताचा संकल्प यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन


मुंबई दि. २७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मनिर्भर भारताचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करा, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपा प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या बैठकीचा समारोप करताना फडणवीस बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला समर्थ नेतृत्व मिळाले आहे. चीन ने लडाख सीमेवर केलेल्या घुसखोरी ला आक्रमक उत्तर देऊन नरेंद्र मोदी यांनी सध्याचा भारत १९६२ चा भारत नाही,  हे दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प जाहीर केला आहे. हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.

राज्यातील कोरोना फैलावा मुळे निर्माण झालेल्या स्थितीचा सामना करण्यात आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मुंबईत चाचण्यांची संख्या वाढवा अशी सूचना वारंवार करूनही हे सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकारच्या या नाकर्त्या कारभाराचा फटका जनतेला बसत आहे, असेही.फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस पुढे म्हणाले की, लॉकडाऊन मुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात आघाडी सरकार कुचराई करत आहे.

बारा बलुतेदार वर्गाला आघाडी सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. आत्मनिर्भर भारत पॅकेज मधून केंद्र सरकारने मोठी मदत करूनही आघाडी सरकार आपले अपयश झाकण्यासाठी केंद्रावर दोषारोप करत आहे. दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करेपर्यंत भाजपा चे आंदोलन चालूच राहील. एक ऑगस्ट रोजी होणारे दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठीचे आंदोलन पूर्णपणे अहिंसक स्वरूपात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 

Social Media