मुंबई, दि. ७ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणाचे गांभीर्य आणि निकड या कारणासाठी राज्यात काही महिने बदल्यांना स्थगिती देण्याचा आदेश देणा-या नगरविकास विभागाने त्याच कारणासाठी मुख्याधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा बंपर धमाका सुरू केला आहे. सोमवरी राज्यातील विविध नगरपरिषद/ नगरपालिका आणि मनपात कार्यरत असलेल्या वर्ग अ व ब च्या तब्बल 76 पेक्षा अधिक मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांना कोरोना नियंत्रणासाठीचे “गांभीर्य” आणि “निकड” असे गोंडस नाव देत घाऊक बदल्या केल्या असून या बदल्याच्या माध्यमातून नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत?असा प्रश्न मंत्रालयातच विचारला जात आहे. विशेष म्हणजे गृह विभागाच्या बदल्यांना मुख्यमंत्री तात्काळ स्थगिती देत असतानाच नगरविकास विभागाने बंपर बदल्यांचा धमाका केला आहे. राज्याच्या शहरी भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून स्थानिक नगरपालिका,नगरपरिषद आणि मनपा विविध उपाययोजना करत आहे. शिवाय राज्य सरकारने नियमित बदल्या न करण्याचे धोरण स्विकारले असले तरी कोरोनाच्या नियंत्रणाचे कारण देत नगर विकास विभागाने या घाऊक बदल्या केल्या आहेत.
या संदर्भात संबंधीत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता काही रिक्त जागा भरण्यात आल्याचे सांगण्यात आले. कोरोना काळात गेल्या चार महिन्यात जर काही मुख्याधिकारी स्तरावरील जागा रिक्त होत्या तर त्या कधीपासून होत्या? आणि कोरोनाच्या आधीपासून काही जागा रिक्त असतील तर मग त्या तात्काळ का भरल्या गेल्या नाही? कोरोनाचा प्रादुर्भावाला सुरुवात होऊन चार महिने उलटून गेले असता,आणि आता कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वेगाने वाढत असतांना या घाऊक बदल्या करण्यामागची नेमकी “निकड” काय?इ त्यादी प्रश्नाना या अधिका-यांनी बगल दिली आहे.
एका नगर परिषदेतून दुसऱ्या नगर परिषदेत बदली करण्यात आल्याने यात नेमके कोणते “गांभीर्य” नगरविकास विभागाने अधोरेखित केले? असे विविध प्रश्न उपस्थित झाले आहे. शिवाय कोरोना वाढीच्या काळात गेल्या चार महिन्यापासून काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या केल्याने कोरोनाविरोधी सुरू असलेल्या कामावरही परिणाम होणार नाही का? असाही सवाल उपस्थित झाला आहे.
नगरविकास विभागाने मे आणि जून महिन्यातही बदल्यांचा धमाका सुरू ठेवला होता. आता जुलै महिन्यातही बदल्यांचा धमाका सुरूच आहे. गेल्या तीन महिन्यात करण्यात आलेल्या बदल्यांमुळे त्या त्या शहरात किती प्रमाणात कोरोना आटोक्यात आला? यावर नगरविकास विभागाने स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता असल्याची चर्चा पुढे येऊ लागली आहे.त्यामुळे गृह विभागाच्या बदल्या करताना विश्वासात न घेतल्याने त्यास स्थगिती देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत काय भूमिका घेणार ? याकडे आता लक्ष लागले आहे.