मुंबई : राज्य विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यसरकारच्या चहापानावर बहिष्काराची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, अहंकाराने तुघलकी निर्णय घेणारे सरकार जनतेच्या प्रश्नांवर अधिवेशनात चर्चेसाठी वेळ न देता पळ काढत आहे. त्यामुळे या अपयशी सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार घातला असून भ्रष्टाचाराचा पंचनामा या अधिवेशनात करू.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यानी परंपरेनुसार विरोधीपक्षांसाठी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर प्रमुख विरोधीपक्ष भाजपने बहिष्कार घातला. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, केवळ काही तासांचा कामकाजाचा वेळ असलेले हे दोन दिवसांचे अधिवेशण असेल.
पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव असल्याने फारसे कामकाज होणार नाही. मागील अधिवेशनातही विरोधकांना त्यांचे म्हणणे मांडू न देता सत्तापक्षांनेच गोंधळ घातला होता. त्यामुळे हे सत्र कोरोनाच्या कारणामुळे नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय घेताना ते दोन आठवडे असावेअशी आमची मागणी होती. मात्र ती फेटाळण्यात आली. फडणविस म्हणाले की, सर्वच राजकीय पक्षांचे मेळावे होताना दिसत आहेत मात्र केवळ अधिवेशनाला कोरोनाचे कारण दिले जात आहे. याचे कारण सरकार चर्चेपासून पळ काढत आहे हे आहे. सरकारच्या गैर कारभाराचा पंचनामा विरोधक करतील म्हणून सरकारने हे अधिवेशन काही तासांच्या औपचारीकतेपुरते ठेवले आहे. मात्र त्यामुळे जनतेचे प्रश्न दु:ख मांडण्याचा प्रयत्न विरोधक सोडणार नाहीत. मुख्यमंत्र्यानी आमची पंतप्रधानाना तक्रार केली तरी जनतेच्या हितासाठी भांडत राहू असे फडणवीस म्हणाले.
ते म्हणाले की, राज्यात शेतकरी संकटा त आहे मात्र त्याला काहीच मदत सरकारने केली नाही. सर्वाधिक कोरोना मृत्यू होवूनही सरकार लाथ थोपविल्याचे सांगत स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. कोरोनाच्या काळात महिलांवर अत्याचारापासून प्रचंड भ्रष्टाचार सर्व स्तरांवर झाला आहे त्याची पोलखोल करू. महिलांच्या संरक्षणासाठीचा शक्ती कायदा घाईने संमत करून न घेता त्यावर सखोल चर्चा करण्याची गरज असल्याने सरकारने हा कायदा या सत्रात संयुक्त समितीकडे पाठवावा अशी मागणी त्यानी केली. मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर सरकारची भुमिका दोन्ही समाजाचे स्वास्थ बिघवडणारी आहे, मंत्री त्या बाबत परस्परविरोधी भुमिका मांडत असून जाणिवपूर्वक समाजात तेढ निर्माण केली जात आहे असा आरोप त्यानी केला. वीज बिलांपासून मुंबई मेट्रो पर्यंतच्या सर्वच प्रश्नांवर या सरकारचा घोळ सुरू असून त्याचा भुर्देंड जनतेला सहन करावा लागत आहे. त्यामुळे अश्या राजकीय अहंकारी सरकारच्या तुघलकी निर्णयांचा समाचार घेत राहू आणि निषेध करत चहापानावर बहिष्कार घातला असल्याचे ते म्हणाले.