डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे देहावसान

मुंबई : देशभरात अहमदपुरकर महाराज म्हणून ख्यातकीर्त असलेले आपल्या अनुयायांमध्ये आप्पा नावाने एकरूप झालेले वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे आज नांदेड येथे दुपारच्या च्या दरम्यान निधन झाले. त्यांनी वयाची शंभरी ओलांडली होती. याही वयामध्ये त्यांच्यातील ऊर्जा आश्चर्यकारक अशीच होती. शेवटपर्यंत ते कार्यरत होते. MBBS ची रीतसर वैद्यकीय पदवी घेतलेल्या महाराजांचा सुरुवातीपासूनच अध्यात्माकडे कल होता.

सांसारिक मोहापासून अलिप्त राहून त्यांनी समाजाला कायम वस्तुनिष्ठ दिशा देण्याचं काम केलं. ते आजीवन ब्रह्मचारी होते. आध्यत्मिक आणि विज्ञाननिष्ठ संत अशीच त्यांची शेवट पर्यंत ओळख होती. महाराष्ट्रासह अनेक राज्यात त्यांना मानणारा मोठा भक्त समुदाय आहे. त्यांच्या जाण्याने सगळीकडेच शोककळा पसरली आहे. अहमदपूर येथे त्यांनी भक्तीस्थळाची स्थापना केली आहे.

मागील 3/4 दिवसापासून त्यांनी अन्नत्याग केल्यामुळे त्यांची प्रकृती क्षीण झाली होती शेवटी अनुयायांच्या आग्रहावरून त्यांना अहमदपूर हुन नांदेडच्या काब्दे रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज दुपारच्या सुमारास या पुण्यात्म्याने आपली इहलोकीची यात्रा संपवून दिव्यात्म्यात विलीन झाले. आध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालणारा तारा कायमचा निखळला. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी हानी झाली. सायंकाळी 5.30 च्या सुमारास नांदेड हुन भक्तांच्या गर्दीत पोलीस बंदोबस्तात त्यांचे पार्थिव अहमदपूर येथील भक्तीस्थळाकडे रवाना करण्यात आले.

Social Media