मुंबई : शिवसेनेचे कार्यसम्राट नेते राज्याचे नगरविकास मंत्रएकनाथ संभाजी शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शिंदे कोरोना योध्दा होवून मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या युध्दात आघाडीवर होते अखेर त्यांनाही कोरोनाने गाठले. त्यांनी स्वत:च व्टिट करून ही माहिती दिल्यानंतर मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.
“गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने काल त्यांनी कोरोनाची टेस्ट केली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठिक आहे. काळजी करू नका. परंतु, माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोव्हिड चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी,” असे व्टिट शिंदे यांनी केले आहे. त्यानंतर आदित्य ठाकरेंसह उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार अजय चौधरी, आमदार विश्वजीत कदम आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनीही एकनाथ शिंदेना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
“आपण लवकर बरे होऊन महाराष्ट्राच्या सेवेत रुजू व्हाल,” असे ट्विट पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. तसेच “पूर्ण बरे होईपर्यंत आराम करा,” असा सल्लाही आदित्य ठाकरेंनी दिला आहे.
“एकनाथ शिंदेंजी काळजी घ्या, गेले ६ महिने कोरोना विरुद्धचा लढा आपण देखील फ्रंटलाईन वरूनच लढत आहात. आपण लवकर बरे होऊन महाराष्ट्राच्या सेवेत रुजू व्हाल ही मला खात्री आहेच, पण पूर्ण बरे होईपर्यंत आराम करा!”असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
“अत्यंत बिकट परिस्थितीत आपल्या कार्याचा झंझावात सुरूच आहे. आता मात्र काळजी घेणे आवश्यक आहे. भरपूर विश्रांती घ्या. योग्य उपचारानंतर आपण लवकर बरे व्हाल आणि पुन्हा जनसेवेत झोकून द्याल,” असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे.