मुंबई दि. ५ : उस्मानाबाद जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतक-यांना पीक विम्याची नुकसान भरपाई देण्याबाबतचा राणा जगजीतसिंग आणि अन्य सदस्यांचा प्रश्न विधानसभेत गाजला. या प्रश्नावर अखेर समाधान कारक उत्तरे कृषीमंत्र्यानी न दिल्याने भाजप सदस्यांनी सभात्याग केला. या प्रश्नावर विरोधी सदस्यांनी या योजनेत विमा कंपन्याकडून वेळेवर मदत दिली जात नसल्याचा आक्षेप घेतला.
या प्रश्नाच्या उपप्रश्ना दरम्यान भाजप सदस्यांनी शेतक-यांच्या प्रिमियम च्या प्रमाणात अत्यल्प मदत दिली जात असल्याचा आक्षेप घेतला. माजीमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी आक्षेप घेतला की, शेतक-यांना प्रिमीयमच्या प्रमाणात पैसे मिळालेच नाहीत. यावेळी काही सदस्यांनी सरकारने खाजगी कंपन्याकडून कुणाला टक्केवारी मिळत आहे असा आरोप केला. त्यावर कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी राज्य सरकारने याभात केंद्र सरकारच्या कंपन्याकडून विमा देण्याबाबत प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले. मात्र निकष चुकीचे असल्याचे सांगत भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी सरकारला धारेवर धरले. शेतक-यांच्या कृषीमालाला भाव नाही आणि नुकसान झाले तर प्रिमीयमच्या प्रमाणात मदत केली जात नाही असे त्या म्हणाल्या. त्यानंतर भाजप सदस्यांनी घोषणा देत गोंधळ केला. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारने स्वत:ची विमा कंपनी तयार करून मदत करण्याची गरज असल्याचे संगितले. त्यावर सभागृहात गोंधळाची स्थिती होती. कृषीमंत्री म्हणाले की त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला असून त्यावर मंजूरी मिळाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल मंत्र्याच्या या उत्तरानंतर विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यांनी सभात्याग केला.
राज्यभर मोहीम
अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात राज्यातील अंमली पदार्थांचे सेवन आणि व्यापार याविरोधात राज्यभर एक मोठी मोहीम राबविण्यात येईल अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात केली. यावरच्याअबु आझमी यांच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते , या मोहिमेत अन्न आणि औषध प्रशासन, पोलीस, अंमली पदार्थ विरोधी पथक आदी सर्व एकत्रित पणे सहभागी होतील असे ते म्हणाले .अमली पदार्थ बनवणारे कारखाने, बँक खाती सील करू त्यासोबतच या व्यवसायात गुंतलेल्या नायजेरियन नागरिकांच्या बाबत कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यात बदल करू असेही गृहमंत्री म्हणाले.