मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचलनालयाने चौकशीसाठी पुन्हा नोटीस पाठवून आता मंगळवारी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी देशमुख यांना शनिवारी ईडी च्या कार्यालयात हजर व्हायचे होते. परंतु ते उपस्थित राहिले नाही. त्यांच्यावतीने वकीलांनी म्हटले की, चौकशीसाठी लागणारे कागदपत्र उपलब्ध होण्यासाठी काही अवधी हवा आहे. त्यामुळे नवी तारिख मिळावी यासाठी देशमुख यांच्या वकिलांनी ईडी ला कळवले होते.
कागदपत्र मिळाल्यास त्यानुसार उत्तर देऊ
देशमुख यांचे वकिल जयवंत पाटील यांनी म्हटले आहे की, अनिल देशमुख आज ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहणार नाहीत. या प्रकरणाशी निगडीत कागदपत्र ईडी ला मागितले आहेत. ते देण्यात आलेले नाही. ते मिळाल्यास त्यानुसार आम्ही उत्तर देऊ. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे पोलीस आय़ुक्त परमबीर सिंह यांनी शंभर कोटीच्या खंडणी वसुलीचे आरोप लावले होते. त्याप्रकरणी ईडी ने देशमुख यांचे स्वीय सचिव संजिव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक केली आहे. त्यानंतर ईडीने देशमुख यांनाही पुन्हा नोटीस पाठवून मंगळवारी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.