माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन

नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांची प्रकृती आणखी खालावली असल्याची माहिती लष्कराच्या आर अँड आर रुग्णालयाकडून सोमवारी देण्यात आली होती. मुखर्जी यांच्या फुफ्फुसात संक्रमण झाले होते. गेल्या कित्येक दिवसांपासून ते कोमामध्ये होते. रविवारी सायंकाळपासून मुखर्जी यांची प्रकृती जास्त खराब झाली होती.

तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक मुखर्जी यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. २०१२ ते २०१७ या काळात देशाचे १३ वे राष्ट्रपती राहिलेल्या ८४ वर्षीय मुखर्जी यांची तब्येत १० ऑगस्ट रोजी बिघडली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच्या एक दिवस आधीच त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मेंदूत झालेल्या गुठळ्या काढण्यासाठी करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेनंतर मुखर्जी कोमात गेले होते. त्यानंतर ते शुद्धीत आले नाहीत.

Social Media