मुंबई महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून महाविकास मध्ये श्रेयवादाची लढाई सुरू: राजकीय वर्तुळात इंदू मिल निमित्ताने चर्चा!

मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये आता राजकारण सुरू झाल्याचे इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम घाईने  घेवून नंतर अनेकांच्या नाराजीमुळे रद्द करण्यात आल्यावरून स्पष्ट झाले आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांना निमंत्रण नसल्यामुळे सकाळपासून राजकीय वाद रंगला होता. महाविकासआघाडी सरकारमध्ये अहंकार निर्माण झाल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. तर आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनीही सरकारने कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अखेर आजचा हा पायाभरणी सोहळा रद्द करण्यात आल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार होता.

सत्तेवर येताच दलित मतांची टक्केवारी वंचित आघाडीमुळे कमी झाल्याचे लक्षात घेत राष्ट्रवादीने हे स्मारक मुंबई महापालिकेच्या निवडणुकांपूर्वी होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येते त्या खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनाही एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची काल संध्याकाळपर्यंत कल्पना नव्हती. स्मारकाचा आराखडा बदलण्यापासून ते पुतळ्याची उंची वाढवण्याचा निर्णय मुंडे यांच्या खात्याने घेतला होता. शरद पवारांनी स्मारकाच्या बदललेल्या आराखड्याची इंदू मिल इथे जाऊन पाहणी केली होती, मात्र पवारांनीही या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल संध्याकाळपर्यंत या कार्यक्रमाची कल्पनाच नव्हती.अजित पवार पुण्यात असताना त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले, त्यांनी आज पुण्यात विविध कार्यक्रम आणि बैठक घेतल्या होत्या. या स्मारकासाठी आंदोलन करणारे आनंदराज आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण नव्हते, आनंदराज यांना आज सकाळी निमंत्रण देण्यात आले. राज्यातील विरोधी पक्षनेते तसेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण नाही. या कार्यक्रमाचे निमंत्रण एमएमआरडीएतर्फे देण्यात आले होते, मात्र कुणाला आणि कधी निमंत्रण द्यायचे ही यादी मुख्यमंत्री कार्यालयाने अंतिम केली होती. त्यामुळे सत्ताधारी पक्षांच्या श्रेयवादाची ही घाई अंगाशी आल्याचे मत मंत्रालयात व्यक्त करण्यात येत होते.

पुतळ्याची गरज नाही‘, डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत प्रकाश आंबेडकरांची भूमिका
इंदू मिलमध्ये स्मारकाऐवजी लोकोपयोगी वास्तू उभारा असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केले आहे. माझा पुतळा उभारण्याला विरोध आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.  पुतळा उभारण्याऐवजी एक बौध्दीक विचार केंद्र निर्माण व्हावे अस मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. तसेच इंदू मिलमधील स्मारकाच्या कार्यक्रमाला जाण्यात मला रस नाही असेही त्यांनी म्हटले.

Social Media