मुंबई : राज्य विधीमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाचा सोपस्कार अखेर पूर्ण झाला आहे. या अधिवेशनाच्या शेवटी कोविड-१९ च्या लढ्यात विरोधकांसह सर्वाचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. सत्राच्या शेवटी केलेल्या निवेदनात मुख्यमंत्र्यानी येत्या १५ तारखेपासून माझे कुटूंब माझी जबाबदारी या योजनेची घोषणा केली. शासनाचे अनेक विभाग यामध्ये कोविड-१९ सोबत जगताना लोकांना त्यांचे कर्तव्य आणि जबाबदारी समजावून सांगण्यासाठी गृहभेटी घेतील असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी अधिवेशन संस्थगित करण्याची घोषणा करताना उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले की, दोन दिवसांच्या या सत्रात ९ तास ३० मिनीटांचे कामकाज झाले त्यापैकी १ तास १० मिनीटे वेळ तहकूबीमुळे वाया गेला. दोन दिवस सरासरी चार तास ४० मिनीटांचे कामकाज झाले. त्यामध्ये विधेयकांच्या कामकाजात सभेतील १ १ आणि परिषदेतील १ अशी एकूण बारा विधेयके मंजूर करण्यात आली. नियम ४७ अन्वये दोन घोषणा करण्यात आल्या. पुढील अधिवेशम ७ डिसे. २० रोजी नागपूर येथे होणार आहे.