मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथील आणखी सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. येथील सहा कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता सिल्व्हर ओकवरील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या १२ इतकी झाली आहे.
सिल्व्हर ओकवरील ५० कर्मचाऱ्यांची नुकतीच रॅपिड टेस्ट करण्यात आली होती. यापैकी काहीजणांचे कोरोना अहवाल अद्याप आलेले नाहीत. मात्र, आतापर्यंत १२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सिल्व्हर ओकवर चिंतेचे वातावरण आहे. या सर्वांमध्ये अद्याप कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळून आले नाही. त्यांची केवळ चाचणीच पॉझिटिव्ह आली आहे. या सर्वांची रवानगी क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आली आहे.
याशिवाय, खासदार सुप्रिया सुळे यांच्या चालकालाही कोरोनाची लागण झाल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील सर्वांची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. मात्र, या सगळ्यांचे कोरोना अहवाल नेगेटिव्ह आले आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली होती. तेव्हा त्यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली होती. मात्र, कोरोनाचा धोका लक्षात घेता शरद पवार पुढील चार दिवस कोणालाही भेटणार नाहीत. तसेच त्यांनीही राज्यभरात फिरून दौरे करु नयेत, अशी विनंती आपण करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.