राज्याच्या सन २०२०-२१च्या आर्थिक पाहणी अहवालात देशाच्या अर्थकारणाप्रमाणेच राज्याच्या अर्थकारणातही उणे आठ टक्क्यांची घसरण!

मुंबई  : राज्याच्या सन २०२०-२१ च्या आर्थिक पाहणी अहवालात  व्यक्त केलेल्या पूर्वानुमानानुसार देशाच्या अर्थकारणाप्रमाणेच राज्याच्या अर्थकारणातही उणे आठ टक्क्यांची घसरण झाल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. मागील आर्थिक वर्षात कोविड-१९च्या लॉकडावून मुळे आर्थिक क्षेत्राची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे दिसून आले आहे. त्याचाच परिणाम म्हणून उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये अनुक्रमे ११.३ टक्के  आणि ९.० टक्क्याची घट झाल्याचे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे. अस असले तरी कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये मात्र ११.७ टक्क्यांची वाढ असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कोरोनाकाळात कोलमडले आर्थिक क्षेत्र

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या पटलावर आज आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला. या अहवालात कोरोनाच्या काळात कोलमडलेल्या आर्थिक क्षेत्राबाबत तसेच कोरोनाशी लढताना करण्यात आलेल्या उपाय योजनांसाठी करण्यात आलेल्या खर्चाबाबत माहिती देण्यात आली आहे. यानुसार बांधकाम क्षेत्राला कोविड महामारीचा मोठा आघात झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये वस्तुनिर्माण क्षेत्राला उणे १४. ६ टक्के घट झाल्याचे दिसूनआले आहे तर बांधकाम क्षेत्राला ११.८ टक्क्यांची घट झाल्याचे दिसून आल्याचा निष्कर्ष अहवालात नमूद करण्यात आला आहे. कोविड-१९चा फटका हॉटेल आणि आदरातिथ्य क्षेत्राला ९.० टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.

शिवभोजनच्या २.८१ कोटी थाळ्यांचे वितरण

या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, मार्च २०२१ अखेर शिवभोजन थाळीच्या किमतीत घट करून ती पाचरूपये करण्यातआली. ९०६ शिवभोजन केंद्रामधून डिसेंबर २०२० पर्यंत २.८१ कोटी शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आली. या शिवाय प्रधानमंत्री गरीब कल्याण  अन्न योजनेतून धान्य वाटप करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या आर्थिक पाहणी अहवालानुसार  एप्रिल २०००ते सप्टेंबर २०२० पर्यंत देशात थेट परदेशी गुंतवणूक ८१८५२२ कोटी रूपये असून ती २७.७ टक्के होती. मात्र २०२०-२१ मध्ये सप्टेंबर महिन्यात २७,१४३ कोटी रूपयांची थेट परदेशी गुंतवणूक होती. त्यात मँग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत २०२० मध्ये १.१३लाख कोटी असून त्यात २.५० लाखापेक्षा जास्त रोजगार प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

आरोग्यासाठी ७४४. ६५ कोटी रूपये खर्च

या शिवाय कोरोनाकाळात राज्य सरकारने केलेल्याउपाय योजनांवर करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील देखील या आर्थिक पाहणी  अहवालात नमूद करण्यात आला आहे. त्यानुसार महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत सन २०२०-२१ मध्ये डिसेंबर अखेर ४.५४ लाख शस्त्रक्रिया आणी उपचार करण्यात आले त्यापोटी ७४४. ६५ कोटी रूपये खर्च करण्यात आले. या अहवालानुसार कोविड १९ महामारीमध्ये १५ जानेवारी अखेर १९.८४ लाख रूग्णांपैकी १८.८१लाख रूग्ण बरे झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचा दर ९४. ८टक्के होता. तर एकूण मृत्यू ५०,३३६ होते. रूग्ण मृत्यूदर २.५ टक्के होता. तर प्रति लाख लोकसंख्येमागे रूग्णसंख्या १५,६४९ होती. याकाळात राज्यात १.३७ कोटी चाचण्या करण्यात आल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

 

Social Media